राकेश शिंदेपारोळा, जि.जळगाव : येथील स्वराज्य गणेश मित्र मंडळाने यंदा पाच फुटांची गणपतीची मूर्ती स्थापन केली आहे. त्यासाठी चक्क १० हजार कॅप्सूल गोळ्यांचा वापर करून ही गणेशाची मूर्ती साकारली आहे व त्यात तेलाच्या १०० दिव्यांपासून प्रकाशझोत निर्माण करून रोषणाई केली आहे. अतिशय देखणी व सुबक मूर्ती या मंडळाने यंदा तयार केली आहे.पारोळा शहरातील लोहार गल्लीतील स्वराज्य गणेश मंडळाचे यंदा हे चौदावे वर्ष आहे. दरवर्षी निरनिराळे प्रयोग हे मंडळ सादर करते. यासाठी हे मंडळ शहरात प्रसिद्ध आहे. यंदा खराब झालेल्या कॅप्सूल गोळ्या आणल्या आणि त्या निकामी करून सुमारे १० हजार कॅप्सूल गोळ्यांपासून पाच फूट उंचीच्या श्री गणेशाची मूर्ती साकारली आहे. त्यात लाल, निळा, पिवळा, काळा, हिरवा, पांढऱ्या, जांभळा, नारंगी रंगाच्या लहान-मोठ्या आकाराच्या कॅप्सूल गोळ्यांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात एक आकर्षण ठरले आहे.मंडळाने संपूर्ण निसर्गरम्य वातावरणाचा देखावा सादर करून त्यात गणेशाची मूर्ती विराजमान केली आहे. नारळाच्या फांद्या, वडाच्या झाडाच्याा पारंब्या, बांबू, झाडांचा वेल आदी वस्तंूपासून हा देखावा तयार केलेला आहे. त्यात कुठल्याही प्रकारची विद्युत रोषणाई केलेली नाही. त्यासाठी स्टेजवर व परिसरात तेलाचे १०० दिवे लावले जातात. त्यामुळे लख्ख प्रकाशझोत या परिसरात आपणास पाहण्यास दिसतो. त्यामुळे नागरिक हा निसर्गरम्य, आकर्षक देखावा पाहण्यास गर्दी करीत आहेत.तसेच निंबाच्या झाडावरदेखील श्री गणेशाची मूर्ती साकारून झाडे वाचवण्याचा संदेश दिला आहे. कॅप्सूलची श्री गणेशाची मूर्ती ही पाण्यात विसर्जन न करता ती कुठल्यातरी मेडिकल कॉलेजला भेट देण्याचा त्यांचा मानस आहे. मंडळाने आतापर्यंत आरास सादर करण्यात दोन वेळेस प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच दरवर्षी रक्तदान शिबिर घेण्यात येते. या मंडळाचे ज्येष्ठ सभासद राज लोहार, अध्यक्ष राजेंद्र चौधरी, उपाध्यक्ष प्रिन्स जैस्वाल, खजिनदार सौरभ लोहार, सभासद चेतन चौधरी, सनी चौधरी, अक्षय चव्हाण, आदित्य लोहार आदींनी हा देखावा सादर करण्यासाठी परिश्रम घेतले.
पारोळा येथे १० हजार कॅप्सूलपासून साकारली गणेशाची मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 6:13 PM
१०० तेलाच्या दिव्यापासून केली आकर्षक रोषणाई
ठळक मुद्देमूर्ती पाण्यात विसर्जित न करता, मेडिकल कॉलेजला भेट देण्याचा मंडळाचा मानसनिंबाच्या झाडावरही गणेशाची मूर्ती साकारून१० दिवसात कार्यकर्त्यांनी साकारला देखावा