भूषण श्रीखंडे -
जळगाव : एसटी महामंडळाच्या चालकांच्या ताफ्यात पाच महिला चालकांचा समावेश झाला आहे. त्यांना जळगाव एसटी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी नियुक्तपत्र दिले आहे. या महिला चालकांनी पदभार स्वीकारून बसचे स्टिअरिंग हाती घेतले आहे. या महिलांनी ८० दिवसांचे यशस्वी पद्धतीने प्रशिक्षण केले असून, वाहतूक निरीक्षक जे. डी. नाईकडा यांनी त्यांना प्रशिक्षण दिले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिलांना चालक होण्याची संधी दिली आहे. त्यानुसार यापूर्वी जळगाव एस.टी. विभागाने यापूर्वी चाळीसगाव आगारात दोन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आले आहे. मंगळवारी एसटी चालकाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पाच महिला चालकांना आज विभाग नियंत्रकांच्या आदेशाने नियुक्तपत्र देऊन त्यांना पदभार दिला आहे. या पाचही महिला चालकांनी नेमणूक केलेल्या आगारात पदभार घेतला आहे.
या आहेत पाच महिला चालक -जळगाव एसटी विभागात माधुरी प्रल्हाद भालेराव यांची भुसावळ, मनीषा प्रकाश निकम यांची जामनेर, सुषमा रतन बोदडे यांची मुक्ताईनगर, संगीता साहेबराव भालेराव चोपडा, तर सुनीता दंगल पाटील मुक्ताईनगर येथे नेमणूक करण्यात आली आहे.