लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून निर्बीजीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी एकूण १२ कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया करून या कुत्र्यांना पाच दिवस महापालिकेच्या टी.बी.रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या डॉगरुममध्ये ठेवण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासनाने दीड कोटी रुपयांचा मक्ता देऊन नंदुरबार येथील एका संस्थेला मोकाट कुत्र्यांवरील निर्बीजीकरणाच्या कामाचा ठेका देण्यात आला आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्यस्थितीत ही संख्या १९ हजारांपर्यंत पोहोचली आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून वारंवार तक्रारी केल्यानंतर आता मनपाने अखेर निर्बीजीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे मोकाट कुत्र्यांच्या वाढत जाणाऱ्या संख्येत काही प्रमाणात घट होणार आहे.
अशा प्रकारे करण्यात येत आहे काम
१. मनपाकडून सकाळी डॉग व्हॅनमधून ज्या भागात कुत्र्यांची संख्या जास्त आहे. तसेच त्याठिकाणी आक्रमक कुत्र्यांची संख्या वाढली आहे. अशा भागात जाऊन कुत्र्यांना पकडले जात आहे.
२. पहिल्या दिवशी शहरातील मटन मार्केट व तांबापुरा या भागातील सुमारे ३५ कुत्री पकडण्यात आली. त्यापैकी १२ कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
३.कुत्रा पकडून आणल्यानंतर त्या कुत्र्याला जेवण दिले जाते. प्राथमिक तपासण्या करून त्या कुत्र्याची शस्त्रक्रिया केली जात आहे. शस्त्रक्रियेनंतर महापालिकेने टी.बी.रुग्णालयात तयार केलेल्या डॉगरुममध्ये पाच दिवस या कुत्र्यांना ठेवले जाणार आहे.
४. पाच दिवसानंतर ज्या ठिकाणावरून कुत्र्याला पकडले आहे. त्याच ठिकाणी या कुत्र्यांना सोडले जाणार आहे. तसेच शस्त्रक्रिया झाल्याची ओळख म्हणून कुत्र्याचा एका बाजूचा कान व्ही आकारात कापला जाणार आहे.
कोट...
महापालिकेच्या डॉगरुममध्ये एकाचवेळी २५० ते २७० कुत्रे थांबतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर पाच दिवस त्यांना निगराणीखाली ठेवण्यात येत आहे. तसेच ज्या भागातून कुत्रा आणला आहे. त्याच भागात नंतर या कुत्र्यांना सोडले जात आहे.
- डॉ.नीलेश शिरसाठ