लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत शहरात गेल्या वर्षभरात ३५० हून अधिक नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मनपाकडे नगरसेवक व विविध संस्थाकडून मागणी केल्यानंतर मनपाने नंदुरबार येथील एका संस्थेला जबाबदारी दिली आहे. या संस्थेकडून लवकरच मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान, एका कुत्र्यावर निर्बीजीकरणासाठी ९५० रुपये एवढा खर्च येणार आहे. शहरात सध्यस्थितीत १५ हजारपेक्षा अधिक मोकाट कुत्र्यांची संख्या आहे.
मनपाकडून मोकाट कुत्र्यांची समस्या मार्गी काढण्यासाठी नंदुरबारच्या संस्थेला काम दिले आहे. आठवडाभरात या कामाला सुरुवात होणार आहे. शहरात ज्या भागात मोकाट कुत्र्यांची समस्या अधिक आहे. अशा भागात जावून कुत्र्यांना पकडून आणून त्या कुत्र्यांवर ही प्रक्रिया केली जाणार आहे.
शिवाजी नगर भागात ‘डॉग रुम’
मनपाकडून शिवाजीनगर भागात डॉग रुम तयार केला आहे. मोकाट कुत्र्यांवरील निर्बीजीकरण करून नसबंदी शस्त्रक्रिया झालेल्या कुत्र्यांची कमीत कमी चार दिवस निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्यानंतर कुत्र्यांच्या ओळखीसाठी गळ्यात कॉलर चीप लावण्यात येणार आहे. एकूण १५ हजार कुत्र्यांवर निर्बिजीकरण करण्यासाठी वर्षभराचा काळ निश्चित करण्यात येणार असून, प्रभागनिहाय कुत्रे पकडण्याचे नियोजन मनपाकडून आखण्यात आले आहे.
आतापर्यंत २०० हून अधिक कुत्र्यांचे निर्बीजीकरण
मनपाने डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० पर्यंत अमरावतीच्या संस्थेला मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्याचा मक्ता दिला होता. या संस्थेने या तीन महिन्यात २०० हून अधिक कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्यात आले. दरम्यान, आता ज्या संस्थेला काम देण्यात आले आहे. त्या संस्थेच्या कामकाजावर मनपाकडून नेमण्यात आलेल्या समितीकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.