बिडगाव, ता.चोपडा : परिसरात आठ दिवस संततधार पाऊस झाला. मात्र तालुक्यातील चिंचपाणी धरणात अद्याप मृतसाठाच आहे. २० ते २५ गावांसाठीवरदान ठरणाऱ्या चिंचपाणी धरणात फक्त १० ते १२ टक्के साठा असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. त्यासाठी या भागात जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.तालुक्यातील बिडगाव, मोहरद, धानोरा, वरगव्हाण, कुंड्यापाणी, लोणी खर्डी, पंचक, देवगाव, पारगाव यांच्यासह अनेक गांवाना सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणारे चिंचपाणी धरण गेल्या तीन वर्षांपासून भरले जात नाही.अनेक धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा होत असल्याने आनंद व्यक्त होत आहे. मात्र चोपडा तालुक्याच्या पूर्व भागातील चिंचपाणी धरण मात्र अद्याप भरलेले नाही. तालुक्यात झालेल्या संतधार पावसानंतरही धरणात फक्त मृतसाठाच शिल्लक आहे. यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. धरण परिसरात जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.सलग आठ दिवस तालुक्यात झालेल्या भिजपावसाने बहुतांश भागात समाधानकारक परिस्थीती झाली आहे. अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर आले आहेत. अनेक धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा होत आहे.तब्बल ९५ टक्के विहरी यावर्षी कोरड्या पडल्या, तर लाखो रुपये खर्च करून केलेल्या ट्यूबवेल्सही बंद पडत आहेत. त्याचा मोठा फटका बसून यावर्षी शेकडो एकरवरील जगवलेल्या केळी जळून गेल्या आहेत. शेतकरीवर्ग सिंचनासाठी पाण्याअभावी आर्थिक संकटात सापल्याचे धक्कादायक चित्र यावर्षी परिसरात पाहावयास मिळाले. त्यामुळे हतबल झालेला शेतकरी मोठ्या आशेने चिंचपाणी धरण भरण्याच्या प्रतीक्षेत आहे.धरणाचे वसांड्याचे कामही झाल्याने पातळीची क्षमताही दहा फुटांनी वाढलीे. मात्र हे काम झाल्यापासून धरण भरलेच नाही. अद्यापही धरणात मृत साठाच आहे. धरण परिसरात यावर्षी तरी जोरदार पाऊस पडून धरण भरेल, अशी आशा शेतकरी बाळळगून आहेत.
चिंचपाणी धरणात अद्याप मृतसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 6:39 PM