लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर काढण्यात येणाऱ्या विजयी मिरवणुका तसेच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गावठी हातभट्टीची साठवणूक होत असल्याच्या माहितीवरून जिल्हा पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. यात एकूण १०६ गुन्हे दाखल करण्यात आले असून ९५ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एकूण ४४ हजार ७४८ लिटर रसायन, चार हजार ५६४ लिटर गावठी हातभट्टी दारुसह तीन दुचाकी असा एकूण २७ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बंदोबस्ताच्या कामातून पोलिसांना आता उसंत मिळाल्याने कारवाई मोहीम तीव्र करण्यात येऊ लागली आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर अनेक गावांमध्ये विजयी मिरवणुका काढण्यासह आगामी दिवाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारुचा साठा करुन ठेवल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधीक्षक व्ही. टी. भुकन यांना मिळाली. त्यांनी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोलिसांच्यावतीने मंगळवार, ७ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. यात एकूण ६६ गुन्हे दाखल करण्यात येऊन ६४ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १५ हजार २१८ लिटर रसायन, ३ हजार ६११ लिटर गावठी दारू असा एकूण १९ लाख ४९ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये दोन दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. गावठी हात भट्टीची दारू व कच्चे, पक्के रसायन नष्ट करण्यात आले आहे.
या सोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात ठिकठिकाणी मोहीम राबवत एकूण ४० गुन्हे दाखल करून ३१ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २९ हजार ५३० लिटर रसायन, ९३५ लिटर गावठी दारू तसेच ३५ लिटर देशी, विदेशी दारू असा एकूण ८ लाख ६ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आता पोलिस ‘फ्री हँड’ऑगस्ट महिन्यापासून वेगवेगळे सण-उत्सव, त्यानंतर वेगवेगळे आंदोलन या दरम्यान कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्तात अडकले होते. त्यानंतर आता सध्या आंदोलन नाही व ग्रामपंचायत निवडणुकाही आटोपल्याने पोलिस आता कारवाईकडे वळू शकणार आहे. इतर कामातून पोलिसांना मोकळीक मिळाल्याने जिल्ह्यात मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आली.