जळगाव : मुबंई येथील व्ही.केअर फांउडेशन या सामाजिक संस्थेने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुरुवारी चोपडा मार्केटमधील संतोष ट्रेडर्स या दुकानात छापा घालून मुदतबाह्य व शरीराला हानिकारक असलेल्या विदेशी सिगारेटचा १ लाख ९० हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. याप्रकरणी दुकानमालक अरुण पुंडलिक पाटील (रा.गुजराल पेट्रोल पंपाच्या मागे, जळगाव) याच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्ही.केअर फांउडेशन या सामाजिक संस्थेचे अखिलेश मुख्यनाथ पांडे (रा.गोरेगाव, मुंबई) यांना चोपडा मार्केटमध्ये विदेशी सिगारेट होलसेल भावात विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पांडे, क्लेमेट विल्सेन फेरो (रा.मुंबई) व ॲड.कुणाल खरात यांनी गुरुवारी दुपारी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांची भेट घेऊन कारवाईसाठी पोलिसांची मदत मागितली. त्यानुसार जिल्हा पेठचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे, उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर व करुणासागर यांना सोबत घेऊन पथकाने संतोष ट्रेडींगमध्ये छापा घातला असता तीन प्रकारच्या विदेशी सिगारेटचे ६९० बॉक्स आढळून आले. त्याची किंमत १ लाख ९० हजार ५०० रुपये इतकी आहे. पंचाच्या समक्ष पंचनामा करुन हा साठा जप्त करण्यात आला. अखिलेश पांडे यांच्या फिर्यादीवरुन अरुण पुंडलिक पाटील याच्याविरुध्द सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार, उत्पादन पुरवठा व वितरण अधिनियम सन २००३ चे कलम ७ (३),२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दर महिन्याला ३० लाखाची सिगारेट विक्रीमुंबईच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, संतोष ट्रेडींगकडे दर महिन्याला ३० लाखाच्या सिगारेट येतात व त्या कोट्यवधी रुपयात विक्री केल्या जातात. तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या काळात देखील आपण याच दुकानावर छापा टाकून लाखो रुपयांच्या सिगारेट जप्त केल्या होत्या, आता ही दुसरी कारवाई आहे. इंडोनेशिया येथून समुद्रमार्गे हवाल्याने या सिगारेट भारतात येतात. तेथे मुदत संपल्यानंतर या सिगारेट भारतात पाठविल्या जात असून ही एक मोठी साखळी आहे. शरीरासाठी अत्यंत घातक अशा या सिगारेटमुळे दरवर्षी हजारो तरुण कॅन्सरने मृत्यूमुखी पडत असल्याची माहिती पांडे यांनी दिली. दरम्यान, ही कारवाई करताना दुकान मालकाने अरेरावी केली होती, पोलिसांनी दम भरल्याने दुकान मालक वठणीवर आला.