जळगाव : फायनान्स कंपनीच्या नावाने महागड्या दुचाकी अवघ्या सात ते आठ हजार रुपयांत विक्री करणाऱ्या शाहरुख जहूर खाटीक (वय २५, रा. तांबापुरा, जळगाव) व फारुख शेख मुस्तफा (वय ३२, रा. रजा कॉलनी, जळगाव) या बांधकाम मिस्तरी काम करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी सोमवारी अटक केली. दरम्यान, त्यांच्याकडून आणखी दुचाकी हस्तगत होऊ शकतात, अशी शक्यता सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी व्यक्त केली आहे.
जळगाव शहरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास काही मोजक्याच अमलदारांकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत. शाहूनगरातून दुचाकी चोरी झाल्याचा तपास करीत असताना शहर पोलीस ठाण्याचे तेजस मराठे, अक्रम शेख व भास्कर ठाकरे यांना तांबापुरातील एक तरुण रावेर तालुक्यात जाऊन फायनान्स कंपनीच्या नावाने दुचाकी विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, हवालदार विजय निकुंभ, अक्रम शेख, तेजस मराठे, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, प्रफुल्ल धांडे, प्रणेश ठाकूर, योगेश इंधाटे, राजकुमार चव्हाण व गणेश पाटील यांच्या पथकाला संशयिताचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. या पथकाने सर्वात आधी शाहरुख खाटीक याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ शाहूनगरात चोरी झालेली दुचाकी आढळली. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने फारुख शेख याचे नाव सांगितले. जिल्हापेठ व एमआयडीसी हद्दीतून प्रत्येकी दोन व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा पाच दुचाकी चोरल्याची कबुलीही त्यांनी दिली.
रावेरात विक्री केल्या सात हजारांत दुचाकी
या दोघांनी आपण फायनान्स कंपनीत कामाला आहोत. ज्या लोकांनी कर्ज भरले नाही, त्यांच्याकडून या दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कमी किमतीत विक्री करीत असल्याचे सांगून सात ते आठ हजारांत या दुचाकी विक्री केल्या. पोलिसांनी या सर्व दुचाकी जप्त करून शहर पोलीस ठाण्यात आणल्या. या दुचाकींचे मालकही निष्पन्न करण्यात आले आहेत. अधिक तपास अक्रम शेख हे करीत आहेत.