लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक जयवंत बाबुराव भोईटे यांच्या निमखेडी शिवारातील विठ्ठल पार्क येथील घरावर तीन जणांनी दगडफेक, दमदाटी आणि शिवीगाळ केल्याची घटना गुरूवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी जयवंत भोईटे यांनी तिघांविरोधात शुक्रवारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या आधी देखील जयवंत भोईटे यांच्या घरावर दगडफेक झाली होती.
या प्रकरणी कल्पेश संभाजी भोईटे, प्रशांत विलास भोईटे, हेमंत जयवंत येवले अशी तीन संशयितांची नावे आहेत. विठ्ठल पार्क परिसरात जयवंत भोईटे हे आई, पत्नी, मुलगा, भाऊ, वहिनी आणि पुतण्या यांच्यासह राहतात. भोईटे हे मविप्रमध्ये संचालक असून त्यांनी संस्थेमध्ये सुरू असलेल्या कारभाराविरोधात संबंधित विभागांमध्ये तक्रारी केल्या आहेत. या संस्थेत नीलेश रणजीत भोईटे हे मानद सचिव आहेत. जयवंत भोईटे यांनी घेतलेले आक्षेप मागे घेण्यासाठी नीलेश भोईटे यांनी वारंवार दबाव आणला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीनुसार गुरूवारी रात्री जयवंत हे आराम करत असतांना अचानक घरावर दगड पडत असल्याचा आवाज आला. तसेच शिवीगाळ देखील केली जात होती. त्यावर त्यांनी खिडकी उघडून बघितले असता कल्पेश भोईटे, प्रशांत भोईटे, हेमंत येवले हे तिन्ही जण दगडफेक करत होते. त्यावर जयवंत यांनी जाब विचारल्यानंतर तिघांनी गेटवरून उड्या मारल्या आणि आत प्रवेश केला. त्यानंतर कल्पेश भोईटे याने नीलेश भोईटे यांच्या नावाचा उल्लेख करत जयवंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच जयवंत यांचा भाऊ ललीत याला देखील धमकी दिल्याचे म्हटले आहे.
या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. नंतर शेजारी राहणाऱ्या संदीप पाटील, अजय पाटील योगीराज महाजन यांनी या तिघांना समजूत घालून पाठवले. संशयितांविरोधात भादंवि कलम ४५२, ५०४,५०६, ४२७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल पाटील करत आहेत.