जळगाव : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना उद्भवलेल्या अडचणी, समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी राज्यपालांनी आपल्या अधिकारांच्या अंतर्गत निर्णय घेऊन विद्यार्थ्यांची घुसमट बंद करावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्यावतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील जनतेचे अतोनात हाल होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झालेली आहे. याची झळ शहरी व ग्रामीण या दोन्ही भागांना पोहचलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाने आकारलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना सरसकट परत करावे व शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश शुल्कामध्ये सूट मिळावी व इतर कुठलेही शुल्क न आकारता फक्त शिकवणी शुल्क आकारून त्यासाठी मासिक हप्ते प्रदान करण्यात यावे, अशी मागणी मासूच्या शिष्टमंडळाने केली. तसेच ऑनलाईन परीक्षा पद्धतीमध्येमुळे निर्माण झालेली डिजिटल विभागणी बंद करावी तसेच ऑनलाईन परीक्षेत उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी तात्काळ स्वरुपात दूर कराव्यात, अशीही मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी मासूचे संस्थापकअध्यक्ष अॅड.सिद्धार्थ इंगळे, उपाध्यक्ष सुनील देवरे, सचिव प्रशांत जाधव, अनिरुद्ध मोरे, सिद्धार्थ तेजाळे आणि कायदेशीर सल्लगार अॅड.दीपा पुंजानी आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची घुसमट बंद करा, मासूची राज्यपालांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 7:51 PM