ऑनलाईन लोकमत
फत्तेपूर,दि.6- वीज बिलाच्या थकबाकीपोटी वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी येथील बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन केले. यात सरपंचांसह 11 जणांना अटक करण्यात आली. आंदोलनामुळे एक तास बसमधील प्रवाशांचे हाल झाले.
तोंडापूर धरणाहून फत्तेपूरसह परिसरातील 17 गावांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु, वीज बिल थकले म्हणून गेल्या एक महिन्यांपासून वीज वितरण कंपनीने विद्युत मोटारींचा वीजपुरवठा खंडित केला आहे. परिणामी 17 गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
दरम्यान, वास्तविक फत्तेपूर ग्रामपंचायतीने आजपावेतो 27 लाख रुपये वीज बिलाचा भरणा केलेला आहे. उर्वरित ग्रामपंचायती वीज बिलाची वेळोवेळी पूर्तता करीत नाहीत. त्यांच्यासोबत फत्तेपूरलासुद्धा वेठीस धरले जात आहे. तोंडापूर धरणातून पाणीपुरवठा सुरू करावा, यासाठी फत्तेपूर ग्रामपंचायतीने विनंती करूनही वीज वितरण कंपनीने या बाबीची दखल घेतली नाही. परिणामी 5 रोजी सकाळी 10 वाजता सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचारी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन केले.
दरम्यान, गटविकास अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे ताफ्यासह घटनास्थळी हजर झाले. या वेळी गटविकास अधिका:यांनी पाणीपुरवठा त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकत्र्याना पोलिसांनी अटक करून पोलीस ठाण्यात नेले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.