कढोली, ता. एरंडोल : वाळू तस्करी बंद करा अन्यथा खेडी, रवंजे, दापोरी व कढोली ग्रामपंचायती या चार ग्रामपंचायतींनी उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन निवेदन संबंधिताना सादर करण्यात आले.
वाळू तस्करी थांबवण्यासाठी खेडी, रवंजे, दापोरी व कढोली ग्रामपंचायतीच्या वतीने एरंडोल प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनावर खेडी सरपंच वैशाली कोळी, रवंजा सरपंच गोकूळ देशमुख, डापोरी सरपंच नीलेश पाटील, कढोली सरपंच किरण नन्नवरे, भिका कोळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनानुसार, वाळूमाफिया दररोज डंपर व टिप्परद्वारे एकाच वाहनात चार ते पाच ब्रास अवैधपणे वाळू भरून गावातून सुसाट वेगाने धावत असतात. तसेच रस्त्याने शेतमजूर, शेतकरी बैलजोडीसह रस्त्याने वावरत असताना डंपर्स सुसाट वेगाने कट मारून जात असल्याने जीव मुठीत घेऊन गावात तसेच रस्त्याने वावरत आहेत. याविषयी तक्रार करण्याचे सांगताच वाळू माफियांकडून मारण्याची धमकी दिली जात असल्याचे म्हटले आहे.