जळगाव : शाळा दुरुस्तीच्या नावाखाली ८० टक्के रक्कम स्वाहा करायची आणि २० टक्क्यांतून कामे करायची ही पद्धत आता बंद करा, असा इशारा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी जि. प.मधील आढावा बैठकीत दिला. जळगावची जिल्हा परिषद शासकीय योजना राबविण्यात क्रमांक एकवर राहिली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आमदार मंगेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक मीनल कुटे यांच्यासह विभागप्रमुख, तसेच जि. प.चे माजी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
गळत नसलेल्या शाळांना लावली गळती
शाळा वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीचा विषय निघाला असता, आमदार मंगेश चव्हाण यांनी या कामांच्या दर्जावर नाराजी व्यक्त केली. १५ ते २० वर्षांपूर्वी झालेल्या बांधकामांची गरज नसताना दुरुस्ती करण्यात आली. यामुळे ज्या शाळा, वर्ग गळत नव्हते तेही गळायला लागले आहेत. चाळीसगाव तालुक्यात अशा सात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गळत नसताना शाळेचे काम करून तीन लाख रुपयांचे बिल काढले गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर दुरुस्तीच्या नावावर ८० टक्के स्वाहा करायचे आणि उरलेल्या २० टक्क्यांतून कामे करायची हे प्रकार आता बंद करा. कामात दर्जा ठेवा, असा इशारा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिला.
त्यांना पाढेही म्हणता येत नाहीत
आमदार मंगेश चव्हाण यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची स्थिती अतिशय वाईट असल्याचे सांगितले. चौथीच्या मुलांना लिहिता-वाचता येत नाही. पाचवीची मुले इंग्रजी वाचू शकत नाही, १३चा पाढा म्हणून शकत नाहीत. पाच विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवतो. त्यापेक्षा दोन शाळा एकत्र करा, शासनाच्या धोरणानुसार या विद्यार्थ्यांना प्रवासाचा खर्च द्या, असेही मुद्दे चव्हाण यांनी मांडले. चांगल्या २५ शाळा निवडून त्यांना पुरस्कार द्या. पण राजकीय नेत्यांच्या शिफारसीवर या शाळा निवडू नका. चांगल्या कामाला प्रोत्साहन द्या, ग्रामीण भागातील शाळांमध्ये सेमी इंग्लिश सुरू करा, अशी सूचनाही त्यांनी केली. प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी कोरोनानंतर शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
त्यांनी रुग्णवाहिका थांबविल्या
आरोग्य विभागासाठी दोन कोटी रुपये खर्चून ११ रुग्णवाहिका घेण्यात येणार आहेत. ही वाहने दोन ते तीन लाख किमी धावल्यानंतर कमी देखभाल-दुरुस्तीत चालली पाहिजे. त्यामुळे घाई करू नका. या संदर्भात बैठक घेऊन योग्य अशीच वाहने खरेदी करू, असे निर्देशही महाजन यांनी दिले. जलजीवन मिशनमधील कामे पूर्ण करा. कार्यादेश देऊनही कामे होत नसतील तर त्याची निविदा परत काढा. योजना फेल जाणार नाही याकडे लक्ष द्या, अशी सूचनाही यावेळी देण्यात आली. तालुक्याच्या ठिकाणी बचत गटांना स्टॉल लावण्यासाठी जागा देण्याची सूचनाही करण्यात आली.