लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अमृत योजना आणि भूमिगत गटारांसाठी जळगावमध्ये सर्वत्र चरे खोदण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना खड्डे आणि धुळीचा त्रास होत आहे. दोन्ही योजनांच्या ठेकेदारांनी सुरू असलेले काम थांबवून आधी चरे बुजवा, असे निर्देश महापौर भारती सोनवणे यांनी दिले आहेत.
महास्वच्छता अभियानात महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, नगरसेविका रंजना वानखेडे, रेश्मा काळे, मनोज आहुजा, भरत सपकाळे, गोकुळ पाटील, कुंदन काळे, विजय वानखेडे, सहआयुक्त पवन पाटील, शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोले, एस.एस.पाटील, बाबा साळुंखे सहभागी होते.
प्रभाग १६, १७, १८ मध्ये जागोजागी खड्डे पडले आहेत. पायी चालतानाही मोठी कसरत करावी लागत आहे. नागरिकांना धुळीमुळे आजारांना सामोरे जावे लागत आहेत. महापौर भारती सोनवणे यांनी अमृत आणि भूमिगत गटारींची कामे त्वरित बंद करून, अगोदर ज्या ठिकाणी खोदले आहे, ते चरे दुरुस्त करण्याच्या सूचना मक्तेदाराच्या प्रतिनिधींना दिल्या.
मासूमवाडी नाल्याचे इस्टिमेट करा
मासूमवाडी परिसरात असलेला मोठा नाला दुसऱ्या बाजूला योग्य पद्धतीने जोडण्यात आलेला नसल्याने, पावसाळ्यात नागरिकांचे मोठे हाल होत असल्याची समस्या नगरसेवकांनी मांडली असता, नाल्याच्या दुरुस्तीकामी आणि नव्याने स्लॅब कल्व्हर्ट तयार करण्यासाठी इस्टिमेट तयार करण्याचे महापौरांनी सांगितले.
गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस
बुधवारी महास्वच्छता अभियानासाठी मनपाच्या ४३६ कायम कर्मचाऱ्यांपैकी ३९४ तर मक्तेदाराचे ४०० पैकी ३७६ कर्मचारी हजर होते. मनपाच्या ४२ गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, तर मक्तेदाराच्या २४ गैरहजर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला आहे.
तीन प्रभागांतून १७ टन अतिरिक्त कचरा संकलित
सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत शहरातून २८७ टन कचरा संकलित करण्यात आला. इतर दिवशी दर दिवसाला सरासरी २७० टन कचरा संकलन केला जातो. मोहीम असलेल्या तीन प्रभागांतून तब्बल १७ टन अतिरिक्त कचरा संकलन करण्यात आला.