लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नाशिक येथे एका कंपनीच्या एका बॅचच्या एम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनमुळे काही रुग्णांना रिॲक्शन आल्यानंतर जिल्ह्याला प्राप्त १५० इंजेक्शन थांबविण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही काही इंजेक्शन हे रुग्णांना न देता बाजुला ठेवण्यात आले आहेत. नाशिकवरून अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असे १०० इंजेक्शन आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिकला रिॲक्शन आल्यामुळे नाशिकची ही बॅच आता अन्न व औषध प्रशासन विभागाकडे जाणार असून, प्रयोगशाळेत याची तपासणी होणार आहे. ही तपासणी झाल्यानंतर हे इंजेक्शन वापरायचे की नाही, याबाबत निर्णय होणार आहे. त्यानुसारच स्थानिक जीएमसीतून ते कंपनीला परत करायचे की रुग्णांना द्यायचे हा निर्णय त्या अहवालावर अवलंबून असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्याला प्राप्त ३३५ नव्या इंजेक्शनचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे इंजेक्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.