जळगाव : कोरोनाकाळात भरती केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ३१ ऑगस्टपासून काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुमारे ८० कर्मचाऱ्यांची सेवा रद्द करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा मनुष्यबळाचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
दरम्यान, कोविड काळात सेवा दिल्याने सेवा पूर्ववत ठेवावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. गेल्यावर्षी ७८२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पहिली लाट ओसरल्यानांतर यापैकी काही कर्मचारी कमी करण्यात आले होते. मात्र दुसऱ्या लाटेत पुन्हा भरती करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्याअखेरीस सुमारे ८० कंत्राटी कर्मचारी कार्यरत होते. हे कर्मचारी कोविड रुग्णालय, डेटा एंट्री ऑपरेटर, लसीकरण केंद्र या ठिकाणी कार्यरत होते. दरम्यान, कोरोनाकाळात जिवाची पर्वा न करता काम केले असून, आमची सेवा रद्द न करता ही सेवा पूर्ववत ठेवावी, अशी मागणी जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांच्याकडे केली आहे.