उत्पादन झालेला कांदा दीर्घकाळ साठवून ठेवण्यासाठी खूप अडचणी येतात. त्यातच जळगाव जिल्ह्याचे तापमान हे उन्हाळ्यात ४० अंशाच्या वरती पोहोचत असते. हे वातावरण कांदा साठवणीसाठी पोषक नसून नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांप्रमाणे जळगाव येथील शेतकऱ्यांना कांदा दीर्घकाळ साठवून ठेवता येत नाही. कालांतराने तापमानामुळे हा कांदा खराब होतो. तरीदेखील काही शेतकरी कांदा चाळीच्या माध्यमातून हा कांदा साठवून ठेवतात; परंतु नाशिक जिल्ह्यातील शेतकरी साठवून ठेवलेला कांदा हा पोळा सणानंतर विक्रीस सुरुवात करतात. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील कांदा पोळा सणापर्यंत टिकत नाही; त्यामुळे लवकर हा कांदा बाजारपेठेत न्यावा लागतो आणि बाजारभाव कमी असल्यामुळे उत्पादन आणि खर्चामध्ये तफावत असते. त्यामुळे येथील शेतकरी कांदा लागवडीकडे दुर्लक्ष करत आहेत.
साधारणत: कांदा लागवड डिसेंबर महिन्यात ते जास्तीत जास्त जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करतात. सुरुवातीला कांद्याच्या फुलांपासून बी धरून ते बी पाण्याचा निचरा होणाऱ्या वाफ्यांमध्ये टाकले जाते. कांद्याच्या बीपासून रोप तयार होण्यासाठी साधारणतः ४५ ते ५० दिवस इतका कालावधी लागतो. कांदा लागवडीनंतर ते काढणीपर्यंत ९० दिवसांचा काळ असतो; परंतु येथील हवामान आणि जमीन यामुळे आपल्याकडील कांद्याला साधारणतः साडेतीन ते चार महिने कालावधी कांदा तयार होण्यासाठी लागत असतो.
एका एकरामध्ये बियाण्यापासून ते काढणीपर्यंत ३५ ते ४० हजार रुपयांपर्यंत खर्च हा कांदा लागवडीसाठी येतो. या परिसरात साधारणत: एका एकरामध्ये ८० ते ९० क्विंटल कांदा शेतकरी पिकवतो. गेल्यावर्षी कोरोनाच्या महामारीमध्ये लॉकडाऊनच्या काळात मातीमोल भावात कांदा विकला होता.
आंतरपीक म्हणून कांद्याला पसंती
गिरणा परिसरात गुढे, कोळगाव, खेडगाव, पथराड, नावरे, सावदे, जुवार्डी, बहाळ तसेच संपूर्ण भडगाव तालुक्यात लिंबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. काही प्रमाणात पेरूचेदेखील उत्पादन शेतकरी घेतात. या परिसरातील जमीन काळी कसदार असल्याने शेतकरी लिंबू किंवा पेरू फळबाग लावली की, त्यात तीन ते चार वर्षे आंतरपीक घेतात. त्यामध्ये अनेक शेतकरी कांदा पिकाला आंतरपीक म्हणून पसंती देत असतात.
कांदाचाळ आणि शेतकरी
बरेच शेतकरी यंदा कांदा लावला की पुढच्या वर्षी कांद्याचे पीक घेत नाहीत. त्यामुळे एका वर्षासाठी कांदाचाळीसाठी शेतकरी लाखोंचा खर्च करत नाहीत. म्हणूनच शेतकऱ्यांना साठवण्यासाठी कांदाचाळ उपलब्ध नसल्यामुळे माल निघाल्यावर लगेचच चार ते पाच रुपये प्रतिकिलो दराने विकण्याची वेळ येते. लगेच मार्केटला पाठवला तर बाजारभाव मिळत नाही आणि साठवला तर तो तापमानामुळे जास्त काळ टिकत नाही, अशा दुहेरी संकटात गिरणा पट्ट्यातील शेतकरी सापडतो.
यावर्षी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांत गारपीट, अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाला. त्यामुळे आज चांगला कांदा दहा रुपयांपासून ते पंधरा, सोळा रुपये प्रतिकिलोपर्यंत विकला जात आहे; परंतु अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे आलेल्या उत्पादनात झालेल्या मोठ्या प्रमाणात घटीमुळे उत्पादन खर्च आणि उत्पादन यामध्ये ताळमेळ बसताना दिसत नाही. जळगाव जिल्ह्यात कांद्याला चांगली बाजारपेठ नसल्यामुळे येथील शेतकऱ्याला आपला माल नाशिक जिल्ह्यातील उमराणा, मुगंशे, चांदवड, मनमाड या बाजारपेठांत घेऊन जावा लागतो.
जळगाव येथे कांदा मार्केट आहे; परंतु तेथे कांदा हा गोण्यांमध्ये भरून घेऊन जावा लागतो. गोण्यांचा खर्च आणि भरण्याची मजुरी न परवडण्यासारखी आहे. चाळीसगाव येथे स्पेशल कांदा मार्केट गेल्या तीन चार वर्षांपासून सुरू करण्यात आले असले तरी उमराणा, मुगंसे, पिंपळगावच्या बाजारभावापेक्षा चारशे, पाचशे रुपये भाव कमी असतो.
कांदा पीक लागवडीसाठी मेहनत आणि खर्च जास्त येतो. उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत.
-संकेत जगताप, गुढे
चाळीसगाव कांदा बाजार समितीत इतर बाजार समित्यांप्रमाणे जास्तीत जास्त बाजारभावामध्ये कांदा खरेदी करावा, अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे.
-प्रमोद महाजन, गुढे
===Photopath===
270521\27jal_1_27052021_12.jpg
===Caption===
साठवणुकीचा अभाव त्यात अवकाळी पावसाचा जोर