धरणगाव, जि.जळगाव : पूज्य सानेगुरुजी हे मातृहृदयी शिक्षक होते. ते सदैव म्हणत ‘करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयांचे’ या उक्तीप्रमाणेच ते जगले. मुलांना त्यांनी छान छान कथा सांगितल्या. मुलांमध्ये देव पाहिला. त्यांच्या नावाने प.रा.विद्यालयात गेल्या अनेक वर्षापासूून कथामाला चालते, ही खूप आनंददायी घटना आहे. कथांमधून बालमनात आनंदासह, मनोरंजन, ज्ञान आणि संस्कार पेरता येतात. चांगला शिक्षक हा उत्कृष्ठ कथाकार असतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिका माया धुप्पड यांनी केले. त्या विद्यालयात पूज्य सानेगुरुजी कथामाला उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सानेगुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सी.ए.शिरसाठ आणि चमूने विद्यालयाचे पी. आर.गीत सादर केले. पर्यवेक्षक डॉ.एस.ए.सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी विद्यालयातील कथामालेच्या वाटचालीचा आढावा घेतला.माया धुप्पड यांनी आपल्या ओघवत्या शैलीत, हावभावांसह अनेक कथा, कविता सादर करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अनेक कवितांना विद्यार्थ्यांनी वन्समोअर दिला.२५ कथापुष्पांची मालामुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी यांनी आपल्या मनोगतातून कथामालेंतर्गत पुढील २५ गुरुवारी कथाकथन होणार असल्याचे जाहीर केले. यासाठी खान्देशातील मान्यवर कथाकथनकार एक एक कथापुष्प गुंफतील, असे ते म्हणाले. या कथा विद्यार्थ्यांना ज्ञानासह मनोरंजन देवून संस्कारी बनवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राज्य कवीसंमेलन होणारसंस्थेचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे या कार्यक्रमाने भारावून गेले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांनी विद्यालयात राज्यस्तरीय कवीसंमेलन घेण्याचे आवाहन केले. त्यासाठी सर्वतोपरी मदत देण्याची तयारीही दर्शवली. मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी व पर्यवेक्षक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी याची जबाबदारी स्वीकारत होकार दिला.अध्यक्षीय भाषणात डॉ. अरुण कुलकर्णी यांनी पूज्य सानेगुरुजींंच्या जीवनकार्याचा वेध घेतला. यानिमित्ताने ३० भाग्यवान विद्यार्थी निवडून त्यांना शालोपयोगी बक्षिसे वाटप करण्यात आली. यासाठी उपमुख्याध्यापक एस. एम. अमृतकार व एस. आर. बन्सी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन एस. के. बेलदार यांनी, तर आभार प्रदर्शन कथामाला प्रमुख पी. जी. पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाय.पी.नाईक, प्रवीण तिवारी, राजेंद्र पवार, नितीन बडगुजर, मिलिंद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी कथा-कवितांचा मनसोक्त आनंद घेतला.
कथा बालमनाला आनंदासह मनोरंजन, ज्ञान आणि संस्कार देतात : माया धुप्पड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 8:05 PM