स्वच्छतागृह सुरू ठेवण्याची मागणी
जळगाव : फुले मार्केटसमोरील स्वच्छतागृह सतत बंद राहत असल्याने, नागरिकांची गैरसोय होत आहे. सध्या संचारबंदीमुळे बाजारपेठ बंद असली, तरी अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचा दररोजचा शहरातील वापर सुरूच आहे. मात्र, हे स्वच्छतागृह सतत बंद राहत असल्याने, नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
जळगाव आगारात कर्मचाऱ्यांची १५ टक्के उपस्थिती
जळगाव : शासनातर्फे ३० मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून, यामुळे बससेवाही बंद आहे. त्यामुळे महामंडळ प्रशासनाने आगारातील १५ टक्केच कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश काढले आहेत. पूर्वी आगारात ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मात्र, ही उपस्थिती १५ टक्क्यांवर करण्यात आली आहे. ३० मेपर्यंत १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.
हमाल बांधवांना आर्थिक मदत देण्याची मागणी
जळगाव : कोरोनामुळे रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्याने, याचा परिणाम रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या हमाल बांधवांवर झाला आहे. कोरोना संसर्ग होण्याच्या भीतीने प्रवासी हमाल बांधवांमार्फत सामानाची वाहतूक न करता स्वतः उचलून नेत असतात. त्यामुळे हमाल बांधवांना काम मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदतीची मागणी हमाल बांधवांतर्फे करण्यात येत आहे.
जनरल डब्यात सोशल डिस्टनिंगचा फज्जा
जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडून येणाऱ्या अनेक गाड्या परप्रांतीय बांधवांच्या गर्दीने भरून येत आहेत. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडत आहेत. विशेष म्हणजे अनेक प्रवासी विना मास्क प्रवास करताना दिसून येत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने विना मास्क प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम प्रवाशांमधून करण्यात येत आहे.