जळगाव : रामनगरात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हाणामारीत दगड, चाकू, विळ्याचा वापर करण्यात आला होता.
पूनम स्वप्निल खडसे यांनी फिर्याद दिली आहे. त्या हरिविठ्ठलनगरातील रहिवासी असून रामनगरातील मावशी कल्पनाबाई पाटील यांच्या घराकडे गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री पूनम या आई बायजाबाई, भाऊ विशाल व मुलगा आर्यन यांच्यासह रामनगरात आल्या होत्या. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास अचानक सौद्या नामक तरुणाने त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर दाद्या खामकर, बाजीराव खामकर, खंडू डिसले, वंदना खामकर, सोनी खामकर, त्रिशा, वैशाली व सौद्या यांनी पूनम यांच्यासह त्यांच्या आई, भाऊ तसेच मावशी कल्पनाबाई, सुरेखा सोनवणे, शरद पाटील, भूषण यांना मारहाण करून त्यांच्यावर दगडफेक केली. यात सर्वजण जखमी झाले.
स्पीकर बंद केल्याने उफाळला वाद
वंदना सौदागर खामकर यांनी दुसरी फिर्याद दिली आहे. त्यांच्या घराजवळील मनकर्ना शिंदे यांनी त्यांच्या दुकानात गणरायाची स्थापना केली आहे. शुक्रवारी रात्री शिंदे यांच्या ओळखीतील काही व्यक्ती आरतीसाठी आले होते. ब-याच उशिर झाल्यामुळे रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास वंदना यांचे पती सौदागर यांनी मंडळातील स्पीकर बंद केले. यावरून सौदागर यांच्याशी कल्पना पाटील, शरद पाटील, सुरेखा सोनवणे, ममता टोंगळे, विशाल पाटील, बायजाबाई पाटील, पूनम खडसे, राजेंद्र मराठे, चिन्या मराठे, भु-या मराठे, मनिषा मराठे यांनी वाद घालून त्यांना मारहाण केली. तसेच वंदना, त्यांचे सासरे, सासू, जेठ व जेठाणी यांनाही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.