सतरावे शतक म्हणजे डच चित्रकलेचा सुवर्णकाळ होता. अनेक उत्तम चित्रकारांची फौज त्या काळी डच कलाविश्वात वावरत होती. यातील एक बिनीचा शिलेदार म्हणजे ‘रेम्ब्राँ’. रंगचित्रे, रेखाचित्रे आणि चित्रछापे (एचिंग) या तिन्ही प्रकारात रेम्ब्राँ अतिशय पारंगत होता. तिन्ही मिळून जवळजवळ २५०० कलाकृती त्याने निर्माण केल्या. तो त्याच्या आत्मचित्रांमुळे-सेल्फ पोर्ट्रेटमुळे विशेषत: ओळखला जातो. पण त्याने तशी सर्वच प्रकारची चित्रे काढलीत. विशेष असं की, त्याने आयुष्यात एकच सागरचित्र (सी-स्केप) काढलं. ते म्हणजे, ‘द स्टॉर्म आॅन द सी आॅफ गॅलिली’!हे चित्र बायबलमधल्या एका कथेवर आधारित आहे. येशू त्यांच्या शिष्यांसह शिडाच्या नावेतून गॅलिलीच्या समुद्रातून प्रवासासाठी जात असताना समुद्र अचानक खवळला. त्याच्या लाटा नावेवर आदळू लागल्या. सगळे प्रवासी चिंतेत पडले. परमेश्वराची करुणा भाकू लागले. तेव्हा येशूने सगळ्यांना धीर दिला आणि वादळाला आणि लाटांना शांत राहण्याची आज्ञा केली. त्यानुसार ते वादळ शमलं. समुद्र स्थिरावला. हा बायबलमधील प्रसंग रेम्ब्राँने आपल्या कुंचल्यातून उतरवला आहे. रेनेसन्सच्या काळात, बायबलमधल्या वेगवेगळ्या प्रसंगांवर चित्रे काढण्याची प्रथाच होती. ती या चित्रातही पाळली गेली.येशूसोबत नेहमी त्याचे बारा अनुयायी शिष्य सोबत दिसतात. म्हणजे स्वत: येशू धरून तेरा. पण या चित्रात एकूण चौदा व्यक्ती नावेत दिसतात. यातली चौदावी व्यक्ती म्हणजे स्वत: चित्रकार- रेम्ब्राँ! त्याने स्वत:लाही या नावेत येशूसोबत दाखवलं आहे. (याला म्हणतात कलाकाराचं स्वातंत्र्य!) वादळामुळे नावेतील प्रत्येकाच्या चेहºयावर वेगवेगळे भाव उमटले आहेत. काही जण घाबरले आहेत, काही चिंतेत आहेत, एका शिष्याला तर समुद्र लागल्यामुळे त्याला उलटी होत आहे. हे सर्व नमुदे रेब्राँने बारकाईने चितारले आहेत. या चौदा जणांमध्ये स्वत: येशू मात्र अत्यंत शांत बसलेला दिसतो. चित्राच्या एका बाजूला काळ्याकुट्ट ढगांची गर्दी झालेली दिसते. पण त्यांच्या आडून पिवळसर सोनेरी प्रकाश डोकावतोय. म्हणजे आशेला जागा आहे. या वादळातून आपण सहीसलामत पार पडणार याची येशूला खात्री आहे. आणि, इतरांची येशूवर श्रद्धा आहे. असली श्रद्धादर्शक सूचकता पूर्वीच्या चित्रकृतींमध्ये प्रतीकात्मक पद्धतीने नेहमीच दाखवली जायची. ती समजून घेण्यासाठी आपल्यालाही मनाने सोळाव्या-सतराव्या शतकात जावं लागतं. हे चित्र रेब्राँने सन १६३३ साली काढलेलं आहे. त्या काळची प्रतीकात्मता त्यात पुरेपूर दिसते.प्रत्येक प्रसिद्ध चित्राबाबत एक माहिती आवर्जून दिली जाते. ती म्हणजे, हे मूळ चित्र आता कुठे ठेवलंय. पण ‘द स्टॉर्म...’ या चित्राचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते मूळ चित्र सध्या कुठे आहे याची कोणालाच माहिती नाही. १८९९ च्या सुमारास हे चित्र अमेरिकेतल्या बोस्टन शहरात ‘इसाबेला गार्डनर म्युझियम’मध्ये ठेवलेलं होतं. दि. १८ मार्च १९९० रोजी पोलिसांच्या वेषात आलेल्या चोरांनी हे चित्र शिताफीने चोरलं. त्यासोबत आणखी १२ कलाकृतीही चोरल्या. मात्र या सर्व चोरलेल्या कलाकृतींमध्ये प्रसिद्ध असं चित्र ‘द स्ट्रॉर्म...’ हेच होतं. तेव्हापासून ते चित्र कुठे गेलं आहे आणि कोणाकडे आहे याची कोणालाही माहिती नाही. या गोष्टीला आता २८ वर्षे झाली. पण त्या चोरीचा अजूनही तपास लागलेला नाही. हॉलिवूडच्या चित्रपटांमधून आपली टिमकी वाजवणाºया अमेरिकेला आणि तिच्या एफ.बी.आय.ला अजूनही हे चित्र सापडलेलं नाही.... म्हणतात ना, तसं- ‘तपास सुरू आहे.’पण हे चित्र १६३३ साली काढणाºया रेम्ब्राँला मानवंदना म्हणून आजही इसाबेला म्युझियममधली या चित्राची मोकळी ‘फ्रेम’ तशीच ठेवली आहे आणि कलाप्रेमी रसिक चक्क ही रिकामी फ्रेम बघण्यासाठीसुद्धा तिथे जातात!- अॅड. सुशील अत्रे
द स्टॉर्म आॅन द सी आॅफ गॅलिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:57 PM