महिंदळे ता. भडगाव : ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेप्रसंगी पाणी प्रश्नावर वादळी चर्चा होऊन खडाजंगी झाली. सभेत महिलांनी अचानक हंडा मोर्चा आणला. ग्रामसेवक व सरपंच यांच्या टेबलावर हंडे आपटून संताप व्यक्त करीत महिलांनी पदाधिका:यांना धारेवर धरले. नागरिकांनीही गावातील तुंबलेल्या गटारींचा प्रश्न उपस्थित केला.
गावात तीन महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी मुबलक असूनही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जलवाहिनी नादुरुस्तीमुळे गावक:यांचे हाल होत आहेत. महिन्यातून दोन-तीन वेळेस नळांना पाणी येते. इतर दिवशी सर्वांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ग्रा.पं.कडून केवळ पाईपलाईन नादुरुस्तीचे कारण सांगितले जाते मात्र दुरुस्ती काम केले जात नाही.
यंदा गिरणेला मुबलक पाणी आहे, तेथेच विहिरही आहे. परंतु नादुरुस्त पाईपलाईनमुळे पाण्यासाठी फिरावे लागत आहे. नवीन पाणीपुरवठा योजना त्वरित मंजूर करावी अशी मागणी नागरिकांनी ग्रामसभेत केली. अनेक वषार्पासून ग्रा.पं.चा कारभार तात्पुरत्या ग्रामसेवकावर सुरु आहे. कायमस्वरुपी ग्रामसेवक नसल्याने विकास कामांना खीळ बसल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला.