किरण चौधरी, रावेर (जि. जळगाव) : रावेर तालुक्याच्या काही भागात वादळी पावसाने रविवारी दुसऱ्या दिवशीही तडाखा दिला. यामुळे काही केळीबागा व मोठे वृक्ष व वीज रोहित्रांसह वीजतारा तुटून जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे सात ते आठ गावे अंधारात आहेत.
रावेर तालुक्यातील खिरोदा प्र. यावल, चिनावल, सावखेडा, वाघोदा, सावदा, तांदलवाडी, उदळी या भागात रविवारी सायंकाळी पुन्हा वादळी पाऊस झाला. शनिवारी व रविवारी सुमारे १२५ ते १५० वीजखांब व सहा ते सात वीजरोहीत्र निकामी झाल्याने महावितरणचे अंदाजे ७५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मुक्ताईनगर शहरासह परिसरात दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.