मोबाइलधारकांना कमालीचा मनस्ताप, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म राजकारणी, नेते पदाधिकारी यांना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम असे साधन आहे. परंतु याचा अतिरेक सर्वसामान्य मोबाइलधारकांना कमालीचा मनस्ताप देणारा ठरत आहे. वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी सोडा अगदी गावातील नुकतेच राजकीय पक्षांचा सक्रिय सदस्य झाला, असा नवीन राजकारणी सुप्रभात, जयंती, वाढदिवस, श्रद्धांजली, शुभेच्छा, दिन विशेष असे मॅसेज छानपैकी डीटीपी करून सोशल मीडियावर स्वतःच्या छबीसह झळकू लागले आहेत. यासाठी त्यांनी चक्क डीटीपी करणाऱ्यांना महिनाही ठरवून दिला आहे. इकडे डीटीपी करणाऱ्याने नवीन पोस्ट तयार करून पाठविली की तिकडे हा नवखा पुढारी त्याच्या मोबाइलमध्ये असतील तेवढे ग्रुप आणि नंबरवर या पोस्टचा मारा करतात. वैताग असा की समोरचा एका ग्रुपचे फोटो डिलिट करत नाही तोच दुसऱ्या ग्रुपवर परत तोच पुढारी झळकतो. उरली कसर खासगीतही ते फोटो पाठवतो. मोबाइलधारकांना मनस्ताप इतका की असे प्रसिध्दीपटू समोर दिसले तर त्रस्त मोबाइलधारक तोंड फिरवून घेतात.
-मतीन शेख, मुक्ताईनगर
समाजसेवकांचा उदय
आगामी काही दिवसात जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका होत आहे. यासाठी हवशे- नवशे- गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करीत आहेत. सरकारकडून होत नसेल एवढी जय्यत तयारी ही मंडळी करू लागली आहे. निवडणूक जवळ येत असल्याने आपली छबी लोकांसमोर रहावी, यासाठी आता या मंडळींना समाजसेवेचा जणू पुळका आला आहे. तहसील कचेरीत आलेल्या निराधारांना मदतीसाठी अनेक ठिकाणी टोळ्या तयार झाल्या आहेत. तशा समाजसेवकांच्या टोळ्या अनेक शहरात उदयास आल्या आहेत. बोदवड येथे गेल्या अनेक दिवसांपासून भयानक अशी पाणीटंचाई आहे. त्यावर अद्याप कुणालाच उपाय सापडला नाही. पण काहींना उपाय सापडला आहे. इच्छुकांनी थेट पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. गेली अनेक वर्षे बोदवडकर पाण्याची वाट पाहत आहेत. पण टँकरच्या रुपाने त्यांना पाणी मिळू लागले आहे. आता हे ही नसे थोडके...
- चुडामण बोरसे.