जळगाव : पारंपारिक गुन्ह्यांच्या व्यतिरिक्त आता आॅनलाईन आर्थिक फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असून त्यातील आकडेही चक्रावून टाकणारे आहेत, त्यामुळे या गुन्ह्यांना आळा घालणे व घडलेले गुन्हे तातडीने उघडकीस आणण्यासाठी सायबर व आर्थिक गुन्हे या दोन्ही शाखांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ ला दिली.दरम्यान, जिल्ह्यातील अपघात व त्यात जीव जाणाऱ्यांची संख्या पाहता हा विषय चिंताजनक असून हे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून उपाययोजना केल्या जातील, असेही डॉ.उगले यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षकपदी जळगावात रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच डॉ.पंजाबराव उगले यांनी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ‘लोकमत’ शहर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रविण चोपडा यांनी त्यांचे स्वागत केले. नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक, आगामी विधानसभा निवडणूक त्याशिवाय पोलीस दलातर्फे आगामी काळात केल्या जाणाºया उपाययोजना व उपक्रमांची माहिती डॉ.उगले यांनी दिली. त्यांच्याशी झालेला संवाद त्यांच्याच शब्दात.आॅनलाईन अपहार व फसवणुकीत मोठे आकडेगुन्हेगारी वाढली तशी गुन्ह्याची पध्दतही बदलत चालली आहे. आता मोबाईलवर आलेले संदेश किंवा इंटरनेटच्या माध्यमातून परस्पर खरेदी, बॅँक खात्यातून पैसे वळविणे, एटीएमद्वारे पैसे काढणे त्याशिवाय विविध योजना किंवा आमिष दाखवून लाखो, कोट्यवधीत गंडा घालण्याच्या गुन्ह्यांत वाढ होत चालली आहे.अशा गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी जनजागृती करण्यासह तंत्रज्ञानात तज्ज्ञ असलेले अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करुन त्यांना प्रशिक्षण देणे,अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेतही अशाच पध्दतीचा बदल करुन या दोन्ही शाखांची क्षमता वाढविली जाणार असल्याचे डॉ.उगले यांनी सांगितले.जिल्ह्याची जनता शांतताप्रियजिल्ह्यात रुजू होऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत. या दोन महिन्याचा अनुभव पाहता जिल्ह्याची जनता शांतताप्रिय आणि आदर करणारी आहे.येथे काम करायला खूप वाव आहे. १५ तालुके असल्याने जिल्हा तसा मोठा आहे. त्यामुळे समन्वयात अडचणी येत असल्याचे ते म्हणाले.जळगाव, भुसावळातील टोळ्यांवर कठोर कारवाईजळगाव व भुसावळ या दोन शहरात गुन्हेगारी टोळ्या मोठ्या प्रमाणात उदयास आलेल्या आहेत. या टोळींमध्ये तरुण वर्गच जास्त आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करता या टोळ्या व गुन्हेगार यांच्यावर एमपीडीए व एमसीओसी सारख्या कठोर कारवाई करण्याबाबत हालचाली सुरु झालेल्या आहेत. गुन्हेगारांचा विषय गांभीर्याने घेतला आहे. नागरिकांनी अशा टोळ्यांची माहिती पोलिसांना द्यावी, त्यांचे नाव गोपनीय ठेवले जार्ईल, असेही आवाहन डॉ.उगले यांनी केले आहे.अपघाताच्या घटनात सदोष मनुष्यवधाचा गुन्हाजिल्ह्यात अपघाताचे सर्वाधिक प्रमाण आहे. अपघातात दर महिन्याला ८० ते ९० मृत्यू होतात. अनेक अपघातात खराब रस्ता, साईडपट्ट्या तसेच वळणावर सूचना फलक नसणे हे कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा अपघाताच्या घटनांमध्ये यापुढे संबंधित यंत्रणेवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे डॉ. उगले यांनी सांगितले. काही दिवसापूर्वी महामार्गावरील दूरदर्शन टॉवर ते जैन इरिगेशन कंपनी या मार्गाची पाहणी केली असता धक्कादायक स्थिती आढळून आली. दुचाकीस्वार तर जीव मुठीत घेऊन चालतो. याच मार्गावर सर्वाधिक अपघात झाले आहेत. ते रोखण्यासाठी ‘नही’ व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून उपाय योजना करण्याचे नियोजन आहे.हद्दपार आरोपींबाबत लवकरच निर्णयलोकसभा निवडणुकीत वेळ कमी असल्याने जास्त आरोपींना हद्दपार करता आले नाही. येत्या काळात विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उपद्रवी व गुन्हेगार मोठ्या संख्येने हद्दपार झालेले असतील. हद्दपार केल्यानंतरही गुन्हेगार शहरात वावरत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहे.यात यंत्रणा कुठे कमी पडते कि आणखी काही वेगळे कारण आहे? याची माहिती काढली जात आहे. येत्या काळात निश्चितच चांगले परिणाम दिसून येतील, असेही ते म्हणाले.
सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे बळकटीकरण करणार - जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांची ‘लोकमत’ भेटीत माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 1:03 PM