नातेवाइकांना बंदी
जळगाव : जीएमसीत ठरवलेल्या वेळेव्यतिरिक्त रुग्णालयात जाण्यास रुग्णांच्या नातेवाइकांना बंदी घालण्यात आली आहे. अनेक रुग्णांचे नातेवाईक हे दिवसभर कक्षात येजा करीत असतात, अशा स्थितीत संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने आता ठरवलेल्या वेळेतच त्यातही अगदी कमी वेळासाठी नातेवाइकांना रुग्णांना भेटण्याची परवानगी दिली जात आहे.
खुलासा सोमवारी येणार
जळगाव : जिल्हा परिषदेच्या १२ विभागप्रमुखांना अभिकरण शुल्काची माहिती न दिल्याने नाेटिसा बजावण्यात आल्या असून, त्यात दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. विभागप्रमुखांकडून सोमवारी खुलासे सादर करण्यात येतील, अशी माहिती आहे. यात कृषी विभागाने माहिती दिलेली होती.
औषधींची सेवा
जळगाव : कोरोनाच्या या काळात जिल्हा परिषदेत असलेल्या बाह्यरुग्ण विभागातून त्रासानुसार औषधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी ही सेवा असून अधिकारी, कर्मचारी व सदस्यांसाठी या ठिकाणी औषधी उपलब्ध करून देण्यात येते. या ओपीडीचा हा एक लाभ होत असल्याचे चित्र आहे.
कोरोनामुळे ब्रेक
जळगाव : जिल्हा परिषदेत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांना कोरोनामुळे पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. गेल्या वर्षीही हीच परिस्थिती निर्माण झाली होती. यात आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, स्मार्ट ग्रामयोजना अशा काही मोठ्या पुरस्कारांचा समावेश आहे. ग्रामसेवक पुरस्कारांसाठी मध्यंतरी नियोजन करण्यात आले असते तर कदाचित हा कार्यक्रम पार पडला असता. मात्र, ते नियोजनच झाले नाही.