ऑनलाईन लोकमत
रावेर,दि.2 - तालुक्यातील ऐनपूर येथे दारुबंदी करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पायपीट करून देखील प्रक्रिया सुरु होत नसल्याने महिलांनी रावेर तहसील कार्यालयासमोर बुधवारी ठिय्या आंदोलन केले. रावेर तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पोर्चमध्ये सुमारे तीन ते साडेतीन तास ठिय्या आंदोलन करीत तहसीलदारांच्या अनास्थेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. 11 ऑगस्ट रोजी ऐनपूरच्या जि.प.कन्या प्राथमिक शाळेत दारूबंदीसाठी निवडणूकीद्वारे मतदानाची प्रक्रिया निवासी नायब तहसीलदार सी.एच.पाटील व नायब तहसीलदार कविता देशमुख यांनी घोषित केल्याने ठिय्या आंदोलनाची सांगता झाली. मातोश्री रमाबाई बहुउद्देशीय मंडळ व महिला ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची समक्ष भेट घेऊन दारूबंदीच्या कायमस्वरूपी उच्चाटनाची मागणी केली होती. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी रावेर तहसीलदारांनी दारूबंदीसाठी निवडणूक प्रक्रिया राबवून मतदान घेण्याबाबत 18 जुलै रोजी आदेशित केले होते.