जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन जाहीर झाले आहे. यादरम्यान कोणी जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी, काळाबाजार अथवा वाढीव किंमतीने विक्री करीत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. दरम्यान जिल्ह्यात दीड ते दोन महिने पुरेल एवढा किराणा, धान्य उपलब्ध असून कोणीही चिंता करण्याची गरज नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यासाठी पालकमंत्री व आणि जिल्हाधिकारी यांची बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संयुक्त पत्रकार परिषद झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार गुरुमुख जगवानी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, पोलीस उप अधीक्षक (गृह) डी.बी. पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आदी उपस्थित होते.अडचणीचा फायदा घेऊन पैसा कमविण्याची वेळ नाहीपालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार शक्य त्या उपाययोजना करीत आहे. यात सर्वांचा संयम व सहकार्य आवश्यक आहे. ही वेळ संकटात सापडलेल्यांना मदत करण्याची आहे. अडचणीचा फायदा घेऊन पैसा कमविण्याची नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करू नये. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रत्येकाने घरीच थांबावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.दोन महिने पुरेल एवढा साठाजिल्ह्यात लॉक डाऊनच्या काळात कोणत्याही प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही. भाजीपाला, दूध, अन्नधान्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. पुढील दीड ते दोन महिने ते सहज पुरणार आहे. या सोबतच आपल्या जिल्ह्याची गरज भागवून आपण इतर २ ते ३ जिल्ह्यांना मदत करू शकतो, एवढा भाजीपालादेखील आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये व जीवनावश्यक वस्तूंची गरजेपुरती खरेदी करावी, अनावश्यक गर्दी करू नये तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.प्रत्येक तहसील क्षेत्रामध्ये प्रांताधिकारी तसेच तहसीलदारांना परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आवश्यक सेवा देणारे तसेच अन्न, खाद्य पुरविणाºयांना तहसीलदार, प्रांताधिकारी पासेस् देतील, अशी माहितीही जिल्हाधिकाºयांनी दिली.विलगीकरणाची वाढीव व्यवस्थासुदैवाने जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. मात्र गंभीर परिस्थिती ओढावल्यास दोन हजार जणांचे विलगीकरण करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिली.किराणा दुकानांची वेळ वाढवूजीवनावश्यक वस्तू पुरेशा उपलब्ध असून विनाकारण खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. हे टाळण्यासाठी किराणा, धान्य दुकानांच्या वेळा वाढवून देण्यात येतील, प्रसंगी २४ तास दुकाने उघड्या ठेवू, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिली. यासाठी दुकानदारांनाही सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सोबतच ही गर्दी टाळण्यासाठी वेगवेगळ््या भागात जीवनावश्यक वस्तूंची विक्रीची व्यवस्था करता येईल का, याविषयीदेखील दुकानदारांना आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आतापर्यंत २९ जणांची तपासणीजिल्हायातील २९ संशयितांची आतापर्यंत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोघांच्या तपासणीचे अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. कोरोना प्रतिबंधात्मक म्हणून वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र तपासणी विभागात विशेष कक्ष उभारला असून त्याठिकाणी २० खाटा (बेड) राखीव आहेत. तर महाविद्यालयातील निवासी क्वार्टर्समध्ये देखील २० खाटा राखीव आहेत. तसेच पथकही सज्ज आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. तर जिल्हाभरातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातदेखील कोरोना संशयितांची तपासणीची व्यवस्था केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
साठेबाजी व काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई - पालकमंत्री गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 5:14 PM