मुक्ताईनगर : तालुक्यातील नायगाव फाट्याजवळील आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यावर मुक्ताईनगर पोलिस व परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर पोलिस व परिवहन विभागाचे कर्मचारी निगराणी करत आहेत.मध्य प्रदेशातून येणारे कोणतेही वाहन तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात सोडले जात नसून महाराष्ट्रातील वाहनांना देखील मध्यप्रदेशाकडे जाण्यासाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरातील काही गावे या नाक्याच्या पुढे असल्याने त्यांना दवाखाने व किराणा वगैरे सामान घेण्यासाठीच फक्त ठराविक प्रवाशांना सोडले जात आहे.गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी या सीमा तपासणी नाक्याला भेट दिली. याप्रसंगी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील तपासणी नाक्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. एवढेच नव्हे तर गेल्या तीन दिवसापूर्वी परप्रांतीय राजस्थानी मजुरांना अडकून ठेवले आहे, त्यांच्या सोईसुविधांबद्दल देखील आमदार पाटील यांनी चौकशी केली. याप्रसंगी मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे व मुकेश घुगे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
नायगाव सीमा नाक्यावर कडक नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 5:10 PM