लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीला गृहविलगीकरणातील रुग्णांचीच संख्या अधिक असल्याने शिवाय यांच्यावर पुरेसे नियंत्रण नसल्याने संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे चित्र होते. एकूण सक्रिय रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण हे सुरुवातीला गृह विलगीकरणात होते. मात्र, आता हे निकष अधिक कडक करण्यात आले असून शक्यतोवर कोविड केअर सेंटरलाच रुग्ण दाखल होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
जिल्हाभरात गेल्या तीन महिन्यांत संसर्गाचे प्रमाण हे प्रचंड वाढले आहे. यात मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच असून एका दिवसात २४ पर्यंत मृतांची संख्या गेली आहे. यात गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून यात रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अगदी कमी कालावधीत रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. दरम्यान, या गंभीर बाबींमुळे आता गृह विलगीकरणाच्या अटी अधिक कडक करण्यात आलेल्या आहेत.
एकूण रुग्ण ११०४२४
बरे झालेले रुग्ण ९७३६२
सक्रिय रुग्ण १११०७
गृह विलगीकरणातील रुग्ण ६३४०
१९ रुग्ण मृतावस्थेत
जिल्हाभरात झालेल्या एकूण १९५५ मृत्यूंपैकी १९ मृत्यू हे वाटेतच किंवा रुग्णालयात आणण्याआधीच झाल्याची नोंद आहे. उर्वरित सर्व मृत्यू हे खासगी किंवा शासकीय रुग्णालयात झाल्याची नोंद आहे. सौम्य लक्षणे किंवा लक्षणे विरहित रुग्णांनाच गृह विलगीकणाची सद्य:स्थितीत परवानगी दिली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हे रुग्ण येताय गंभीर होऊन
बाधित आल्यानंतर जे रुग्ण परवानगीनुसार गृह विलगकीरणात राहत आहेत. ते गंभीर होऊन रुग्णालयात आल्याची उदाहरणे नाहीत. मात्र, तपासणी न करता लक्षणे अंगावर काढून स्थानिक खासगी डॉक्टरांचे उपचार घेत वेळ काढणारे रुग्ण गंभीर होऊन रुग्णालयात येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
आधी रुग्ण दाखल करा
कोविड केअर सेंटरमध्येच गृह विलगीकरणाचा अर्ज भेटतो. मात्र, आधी रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यानंतर रुग्णाची प्रकृती बघून डॉक्टर निर्णय घेत असतात. यानंतर सर्व नोंदणी केल्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकाला ही सर्व प्रक्रिया करावी लागते. नंतर रुग्णालयातून घरी सोडले जाते.
कोट
गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे. रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्येच दाखल करण्यात येत आहे. जे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्यावर आरोग्य कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. तपासणी न करता स्थानिक पातळीवरच उपचार घेणारे रुग्ण गंभीर होऊन रुग्णालयात येत आहेत. गृह विलगीकरणातील रुग्ण गंभीर झालेले नाहीत. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक