लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : तालुक्यात वाढत असलेल्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दर सोमवारी संपूर्ण शहरात बंद पाळण्यात यावा, असे पालिका व पोलीस प्रशासनाने व्यापारीवर्गाची बैठक लावून सर्वाना विश्वासात घेत निर्णय घेतला होता. १ मार्च रोजीच दुसऱ्या सोमवारीदेखील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आला.
बाजारपेठेसह महामार्ग व बाजारपेठेला लागून असलेली सर्व दुकाने लहान मोठे व्यापाऱ्यांनी बंद ठेवून शहरात कडकडीत बंद पाळला होता. बाजारपेठेतील सर्व लहान-मोठे दुकानदार व्यापारी, भाजीपाला विक्रेत्यांनी व महामार्गालगत असलेली सर्व हॉटेल रेस्टॉरंट, गॅरेज दुकान, सलून दुकाने, फळविक्रेते यांनी दुकाने बंद ठेवून प्रशासनाला दुकाने बंद ठेवून सहकार्य केले. अत्यावश्यक सेवा असलेली मेडिकल, दूध केंद्र एवढीच दुकाने या ‘बंद’मधून वगळण्यात आली होती. मुख्य बाजारपेठ, महामार्गवरील सर्व दुकाने बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
दर सोमवारी संपूर्ण शहरात स्वयस्फूर्तीने कडकडीत बंद हा पाळताना लोक दिसून येत आहे. यांचे पालिका प्रशासनातर्फे नगराध्यक्ष करण पाटील, उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, आरोग्य सभापती नवल चौधरी, मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील आदींनी व्यापारी व शहरवासीयांचे कौतुक केले.
भाजीपाला लिलावही नाही
सोमवारी कडकडीत बंद असल्याने रविवारी मात्र भाजीपाला लिलावदेखील झाला नाही. कारण रविवारी लिलावात विक्रीसाठी घेतलेला भाजीपाला जर विकला गेला नाही तर सोमवारी बंद असल्याने ती फेकून द्यावा लागला असता. आता रविवारऐवजी मंगळवारी भाजीपाला लिलाव हा ठेवण्यात येतो.
नगरदेवळ्यात बाजारासह गाव बंद
नगरदेवळा, ता. पाचोरा : कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढल्याने दक्षतेचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये संपूर्ण गावासह दर सोमवारचा आठवडे बाजार व खंडेराव महाराज यात्रोत्सव बंद ठेवण्याचा निर्णय कोरोना दक्षता समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार दि. १ मार्च रोजी आलेला सोमवारचा आठवडे बाजार व गाव पूर्णतः बंद होते. शिवाय खंडेराव महाराज यात्रोत्सवातही ठराविक भक्तांनी आपापल्या सोयीनुसार दर्शनाचा लाभ उचलला. एकंदरीत कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.