आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ४ - धूळवडनिमित्त मुलींच्या अंगावर पाण्याचे फुगे फेकणाºया तरुणांना हटकल्याचा राग आल्याने काही टवाळखोर तरुणांनी शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास सिंधी सेवा मंडलनजीकच्या काही घरांवर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला होता. या दगडफेकीत एक महिला जखमी झाली. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचे काम सुरु होते.याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, धूळवडनिमित्त काही तरुणांनी मुलींच्या अंगावर पाण्याचे फुगे फेकले. याबाबत सिंधी कॉलनीतील सेवामंडलनजीक आर.के.ज्वेलर्ससमोर असलेल्या रहिवाशांनी तरुणांना हटकले. त्याचा वचपा काही तरुणांनी शनिवारी रात्री दगडफेक करुन काढला. यात सविता मकडिया ही महिला जखमी झाली. या घटनेचे वृत्त कळताच या ठिकाणी मकडिया परिवारासह काही समाजबांधवांनी धाव घेतली व घटनेचा निषेध केला. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. विटाही घटनास्थळी पडल्या होत्या. काही तरुणांनी या टवाळखोरांचा पाठलाग केला मात्र ते आढळून आले नाही. या घटनेमुळे सिंधी कॉलनीत एकच खळबळ उडाली.माजी नगरसेवक अशोक मंधान यांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत जखमी महिलेसह एमआयडीसी पोलीस स्टेशनला धाव घेतली. यावेळी समाजबांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती मंधान यांनी दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते.