शेंदुर्णी, जि. जळगाव - महिलेची छेड काढल्यावरून शेंदुर्णी येथे दोन गटात हाणामारी होऊन गावात तणावाची स्थिती निर्माण झाली असून या प्रकरणी भाजपाच्या दोन नगरसेवकांसह दोन्ही गटातील १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पैकी १४ जणांना अटक करण्यात आली असून एका गटातील एक जण फरार झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. दरम्यान, दक्षता म्हणून गुुरुवारी रात्री गावात पोलिसांनी जामर बसवून सोशल मीडियावर पसरणारे संदेश रोखले.या बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवार, ७ रोजी संध्याकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास वीज गेलेली होती त्या वेळी खाटीक हानिफ उर्फ पिंट्या खाटीक या तरुणाने एका महिलेची छेड काढत हात पकडला. घरी आल्यानंतर महिलेने हा प्रकार घरी सांगितला. त्या वेळी महिलेच्या घरची मंडळी संबंधित व्यक्तीकडे गेले असता तेथे शाब्दिक चकमक होऊन नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेनंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिलांची पळापळ होऊन काही वेळातच बाजारपेठ बंद झाली. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, पोलीस निरीक्षक डी.के. शिरसाठ यांच्यासह इतरही पोलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. त्या सोबतच सीआरपीएफच्या गाड्या बंदोबस्तासाठी मागवण्यात आल्या होत्या. गावात रात्रभर तणावाचे वातावरण होते. पोलीस अधिकारीही रात्रभर गावात ठाण मांडून होते. ८ रोजी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी घटनास्थळी पाहणी केली.गावात जामर बसविलेगावात घटना वा-यासारखी पसरल्याने तणावाचे वातावरण झाले. त्यामुळे ही घटना आणखी इतरत्र पसरू नये म्हणून पोलिसांनी गावात जामर बसवून पसरणारे संदेश रोखले.दुसºया दिवशी बाजारपेठ बंदघटनेचे पडसाद दुसºया दिवशीही दिसून आले. शुक्रवारी सकाळपासून बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. सोबतच पोलीस बंदोबस्तही कायम होता.या घटनेप्रकरणी छेड काढण्यात आलेल्या महिलेच्या फिर्यादीवरून अकील कादर खाटिक, नमा कादिर खाटीक, इसराइल कादर खाटीक, अमीन कादर खाटीक, वाशीद अकील खाटीक, हानिफ उर्फ पिंट्या खाटीक, वाशिम शकीर खाटीक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना अटक करण्यात आले आहे.दुसºया गटातील महिलेच्या फिर्यादीवरून भाजपाचे नगरसेवक श्याम अरुण गुजर, भाजपाचे नगरसेवक शरद बाबुराव बारी, शरद चिंधू गुजर, सागर ज्ञानेश्वर पाटील, दयावान कडुबा गुजर, गणेश उमेश गुजर, अमोल सुरेश गुजर, सचिन रघुनाथ गुजर, यांच्याविरुद्धदेखील गुन्हे दाखल करण्यात आले. यातील श्याम अरुण गुजर हे फरार असून उर्वरित सात जणांना अटक करण्यात आले आहे.दोन्ही गटातील सर्व जणांविरुद्ध ३२४, १४४, १४७, १४८, १४९, ३५४ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शेंदुर्णीत दोन गटात हाणामारी, गावात तणावपूर्ण शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 10:57 PM