धरणगाव : बांभोरी येथे गिरणा नदी पात्रातील रेल्वे पुलापासून ६०० मीटर भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. येथे होणारे वाळूचे अवैध उत्खनन व वाळू तस्करीला आळा बसावा आणि वाळू उत्खननामुळे रेल्वे पूल कमकुवत होत असल्याकारणाने जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी हे आदेश काढले आहे. त्यामुळे या परिसरात सापडणाऱ्या वाहनावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन व एरंडोलचे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी बांभोरी प्र.चा. येथील गिरणा नदीपात्रातील पुलापासून ६०० मीटर परिसर दोन्ही बाजंूनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल आहे.या क्षेत्रात जे कुणी वा वाहन मालक वाळू उत्खनन करतील त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आदेश बजावले आहेत. याबाबतीत तहसीलदार नितीनकुमार देवरे यांचे मार्गदर्शनात पाळधीचे मंडळ अधिकारी प्रकाश सोनवणे, तलाठी अविनाश पाटील कोतवाल नारायण पाटील यांनी सदर ठिकाणी फलक लावून कारवाई केली आहे.सोबतच रात्री गस्त पथकही नेमण्यात आल्याची माहिती तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली आहे.
वाळू तस्करीपासून रेल्वेपूल वाचविण्याची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 10:31 PM