लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागातील एम.ए. मराठीची विद्यार्थिनी ज्योत्स्ना राहुल कांबळे यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळावर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या एम.ए.मराठीच्या परीक्षेत ज्योत्स्ना कांबळे ही विद्यार्थिनी ९५.६० टक्के गुण मिळवून विद्यापीठात विशेष प्रावीण्यासह सर्वप्रथम येऊन सुवर्णपदकाची मानकरी ठरली. २०१६ च्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यापीठात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी अभ्यास मंडळावर नियुक्त केले जाते. त्या अनुषंगाने ज्योत्स्ना कांबळे हिची विद्यापीठीय अभ्यास मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. हा मराठी विभागासाठी महत्त्वाचा सन्मान मानला जात आहे. विद्यार्थिनीच्या या अभ्यासक्रमातील सहभागाने खान्देशातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त आणि उपयोजनात्मक अभ्यासक्रमाबाबत सूचना अभ्यासक्रम समितीला मिळतील या दृष्टीने तिची ही नियुक्ती गौरवाची बाब मानली जात आहे.
या नियुक्तीबद्दल खा. शि. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. आर. शिरोडे, उपप्राचार्य डॉ. एम. एस. वाघ, उपप्राचार्य डॉ. जी. एच. निकुंभ, उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील, डॉ. जयेश गुजराथी, मराठी विभागप्रमुख डॉ. रमेश माने, मराठी विभागातील प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, प्रा. योगेश पाटील, प्रा. विलास गावीत, प्रा. ज्ञानेश्वर खलाणे, प्रा. किरण पाटील यांनी तिचा सत्कार केला.