जळगाव : रामेश्वर कॉलनीत स्वामी समर्थ केंद्राच्या समोर राहणाऱ्या रोशन संतोष नाथ (१९, मुळ रा.पाटीलवाडा, चोपडा) या विद्यार्थ्याने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता राहत्या घरात साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रोशन नाथ हा मंगळवारी महाविद्यालयात गेला होता. दुपारी तो घरी आला. आई रत्नाबाई या बाजारात गेल्या होत्या तर वडील कंपनीत कामाला गेलेले होते. लहान भाऊ राजेश हा अकरावीला असून तो बाहेर फिरायला गेलेला होता. त्यामुळे घरी रोशन हा एकटाच होता. घटनेच्या काही वेळ आधी तो मोबाईलवर बोलत असताना तणावात असल्याचे चौकातील तरुणांना जाणवले. सायंकाळी घरी गेलेल्या एका मित्राला त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून चौकातील तरुणांनी त्याला तातडीने रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉ.कळसकर यांनी त्याला मृत घोषीत केले. तपासी अमलदार भरत लिंगायत यांनी पंचनामा केला.रोशन हा बाहेती महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता. मदतीसाठी धावून जाणारा अशी त्याची ओळख होती. आत्महत्या करण्यासारखे काय घडले, याबाबत कोणालाच माहिती नाही. बाजारात गेलेली आई रत्नाबाई व कंपनीत गेलेले वडील संतोष शामराव नाथ यांनी थेट जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. रोशनच्या मित्रांनी धीर दिला. बुधवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली.
जळगावात रामेश्वर कॉलनीत विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:33 PM
राहत्या घरात साडीने घेतला गळफास
ठळक मुद्देचोपडा तालुक्यातील रहिवासीअकस्मात मृत्यूची नोंद