जळगाव : गेल्या पंधरा दिवसापासून बस थांबत नसल्यामुळे रायपूर येथील १०० ते १५० विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सकाळी बस स्थानकात आंदोलन केले. तत्पूर्वी या विद्यार्थ्यांनी रायपूर येथे जामनेर-जळगाव बस अडवून महामंडळाचा निषेध केला.रायपूर इथून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी जळगावात येत असतात. जळगाव आगारातून रायपूरसाठी स्वतंत्र बसची सेवा नसल्यामुळे, येथील विद्यार्थी व नागरिक जामनेरकडून येणाऱ्या बसने जळगावत येत असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जामनेरकडून येणाºया बसेस रायपूरला थांबत नसल्यामुळे, विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. मासिक पास काढुनही बस थांबत नसल्यामुळे, विद्यार्थ्यांना खाजगी बसने जादा पैसे मोजून यावे लागत आहे. यामध्ये विशेषत : मुलींचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. यामुळे शुक्रवारी सकाळी संतप्त विद्यार्थ्यांनी रायपूर बस थांब्यावर जामनेर बस अडविली. यामुळे एकच गोंधळ उडाला.जळगाव आगारातही केले आंदोलनसंतप्त विद्यार्थ्यांनी रायपूरला जामनेर बस अडवून, बस चालकाला जाब विचारत दररोज यापुढे बस थांबविण्याची मागणी केली. सुमारे १० मिनिटे विद्यार्थ्यांनी बस अडविली. त्यानंतर याच बसमध्ये बसून विद्यार्थ्यांनी जळगाव आगार गाठले. यावेळी विद्यार्थ्यांसोबत रायपूरचे उपसरपंच मनोज परदेशी यांच्यासह गावातील पदाधिकारी प्रवीण परदेशी, विजय पाटील, कमलाकर परदेशी, अनिल कोळी व इतर नागरिकही उपस्थित होते. यानंतर विद्यार्थ्यांनी वाहतूक अधिक्षिका निलीमा बागूल यांना माहिती दिली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका घेतल्यामुळे, तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर बागूल यांनी जामेनरकडून येणाºया सर्व बसेस रायपूरला थांबविण्यासंजर्भात कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिल्याने, विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
बस थांबत नसल्याने जळगावात विद्यार्थ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:07 PM