बोदवड : जाहीर केल्यानुसार कोरोना काळातील शुल्क माफीचा व सवलतीचा लाभ कृषी महाविद्यालयात देण्यात यावा, अशी मागणी राज्याच्या उच्च शिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
कोरोना काळात राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने राज्यातील ३८ शासकीय, तर १५१ विनाअनुदानित अशा एकूण १८९ कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या ४५ हजार विद्यार्थ्यांना फी सवलतीचा लाभ देण्याचा तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल, अशा विद्यार्थ्यांचे पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण शुल्कात सूट द्यावी, त्याच प्रमाणे फी थकबाकी असल्यास सत्र परीक्षेचा अर्ज करण्यास अडवू नये तसेच त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये असा निर्णय राज्य शासनाच्या उच्चशिक्षण विभागाने घेतला होता. त्याचप्रमाणे वरील महाविद्यालयात विद्यार्थी मदत निधी, विद्यार्थी सुरक्षा विमा शुल्क, वार्षिक पारितोषिक वितरण सभारंभ शुल्क, क्रीडा महोत्सव शुल्क, विद्यार्थी वैद्यकीय तपासणी शुल्क, ओळखपत्र शुल्क, स्नेह संमेलन, गुणपत्रिका शुल्क, नोंदणी शुल्क, नियतकालिक, अश्वमेध, मदत, कल्याण निधी, अशा बाबींवर कोरोना काळात कोणत्याच प्रकारचा खर्च करण्यात आला नाही. यामुळे त्या बाबींसाठी घेण्यात येणाऱ्या शुल्कात १०० टक्के सूट द्यावी.
तसेच जिमखाना, खेळ, ग्रंथालय देखभाल आदी खर्च करण्यात आल्याने या खर्चामध्ये ५० टक्के सूट देण्यात येईल, असे निर्देश कृषिमंत्री यांनी दिले होते. परंतु अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसून, त्याचा भार कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सुमारे ४५ हजार विद्यार्थ्यांवर पडत असून, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी २३ रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेचे बोदवड येथील सदस्य हर्ष विलास कोटेचा यांनी मुंबई येथे जाऊन राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांना निवेदन दिले आहे.
राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांना निवेदन देताना बोदवड येथील हर्ष कोटेचा.