विजयकुमार सैतवाल
स्वातंत्र दिन विशेष
जळगाव : दीडशे वर्षे इंग्रजांच्या जुलमी राजवटीत यातना सोसून प्रत्येक जण ज्या स्वातंत्र्याची प्रतीक्षा करीत होता, ती स्वातंत्र्याची पहाट उजाडताच उत्साह, आनंदाला उधाण येऊन शालेय विद्यार्थी, तरुण हाती तिरंगा घेत अक्षरश: शहरभर धावले होते. स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचा परिपाक असलेला हा बहुमोल क्षण येताच सर्वत्र पताका, फुले लावून शहर सजले होते, अशा स्वातंत्र्याच्या गोड आठवणी ज्येष्ठ मंडळींनी जागविल्या.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दरवर्षी स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा होतो. या राष्ट्रीय सणाचे प्रत्येक जण साक्षीदार होतो, मात्र १५ ऑगस्ट १९४७ रोजीचा क्षण कसा होता, हे ‘लोकमत’ने जाणून घेतले. त्या वेळी पहिल्या क्षणाचे साक्षीदार असलेल्या ज्येष्ठ मंडळींनी ‘त्या’ सुखद आठवणी जागविल्या. त्या आठवणी ज्येष्ठांच्याच शब्दात......
हाती तिरंगा घेऊन शहरभर धावलो...
१९४७ ला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासून राष्ट्रसेवा दलाशी जुडलेलो होतो. त्या काळी मी इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असताना शहरातील ओसवाल वसतिगृहात राहत होतो. १५ ऑगस्ट १९४७ चा सूर्य स्वातंत्र्य घेऊन येताच शहरभर आम्ही पदयात्रा काढण्यासह तिरंगा हाती घेत दिवसभर शहरात धावलो. तत्पूर्वी १४ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री १२ वाजून एक मिनिटांनी रेडिओवर पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या भाषणाने तरुणांमध्ये रोमांच जागले होते. त्या वेळी रेडिओदेखील जास्त नसल्याने आम्ही हे भाषण ऐकण्यासाठी तीन कंदील (आजचा सुभाषचंद्र बोस चौक) भागात गेलो होते. त्या ठिकाणी एका पानटपरीवर रेडिओ होता तेथे मध्यरात्री पोहचलो. त्या क्षणी चाचा नेहरुंनी केलेले भाषण रोमांच उभे करणारे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वातंत्र्याचा आनंद आम्ही सर्वांनी देवकीनंदन नारायण (काँग्रेसचे माजी खासदार) यांच्या सान्निध्यात साजरा केला. आज ८९ वर्षे वय झाले असले तरी स्वातंत्र्याचा तो पहिला दिवस आजही आठवला की, पुन्हा तोच उत्साह संचारतो.
- दलुभाऊ जैन, संघपती, सकल जैन संघ.
मिळालेल्या बिल्ल्याचा सांभाळ
स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी मी शाळेत जात होतो. स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी आम्हाला शाळेत बोलविले व खाऊ तसेच स्वातंत्रदिनाचे बिल्ले वाटप केले होते. ते बिल्ले आठवण म्हणून अनेक वर्षे त्याचा सांभाळ केला. शाळेत भाषणावेळी शिक्षकांनी स्वातंत्र्याची माहिती देत इंग्रजांच्या राजवटीतून सुटका होऊन भारत देश स्वत: राज्यकर्ता देश असल्याचे सांगितले. स्वातंत्र्यांची प्रेरणा एवढी आहे की, ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने स्वातंत्र सैनिकांचा दरवर्षी सत्कार केला जातो.
- डी.टी. चौधरी, माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ
आजही समस्यांसाठी लढा सुरूच
ही मायभूमी ज्या दिवशी इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाली त्या १५ ऑगस्ट १९४७ च्या पहाटेच उत्साहाचे, आनंदाचे वातावरण होते. तो आनंदाचा क्षण आजही स्मरणात आहे. स्वातंत्र्याचा हा पहिला दिवस सण, उत्सव घेऊन आल्याने प्रत्येकाला त्या दिवसाचे अप्रूप कायम आहे. त्या दिवशी खऱ्या अर्थाने स्वातंत्र झाल्याचे वाटले. मात्र ज्येष्ठांच्या समस्यांसाठी आजही आम्हाला फिरफीर करावी लागते. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कायद्याविषयी आजही जनजागृती करीत असतो. समस्या सोडविण्यासाठी यंत्रणेने सजग राहणे आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याची अनुभुती सर्वांना येऊ शकेल.
- सी.जी. चौधरी, सदस्य, प्रादेशिक ज्येष्ठ नागरिक संघ