अमळनेर : तालुक्यातील शिरूड येथे सकाळी होणाऱ्या बसच्या फेºया अनियमित असल्याच्या कारणावरून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी बस अडवून ठेवून आंदोलन केले.येथे सकाळी बसच्या तीन ते चार फेºया होत असतात. त्यात अमळनेर ते मुकटी ही मुक्कामी गाडी, कावपिंप्री कॉलेज बस तसेच विद्यार्थ्यांसाठी अमळनेर-शिरूड ही बस सुरू केली आहे. मात्र शिरूडसाठी स्वतंत्र बस सुरू असल्याने इतर गाड्या शिरूडला थांबा घेत नाहीत. तर शिरुडसाठी येणारी बस ही सकाळी कधी लवकर येऊन निघून जाते तर कधी वेळेपेक्षा जास्त उशिरा येते. बसच्या अनियमिततेमुळे विध्यार्थ्यांना विद्यालयात जाण्यास उशीर होऊन होत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी शिरूडसाठी असलेली स्वतंत्र बस न आल्यामुळे मुकटी मुक्कामी बसला थांबविले. वाहकाने दरवाजा बंदच ठवून विद्यार्थ्यांना चढू न दिल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी बससमोर बाक ठेवून बस अडवून धरली.हा प्रकार समजताच आगार प्रमुख अर्चना भदाणे यांनी ताबडतोब स्वतंत्र बस पाठवून दिली. तसेच उद्यापासून शिरूडची नियमित बस वेळेवर पाठवण्यात येईल, असे सांगितले.