जळगाव : जळगाव-औरंगाबाद मार्गावर नेरीनजीक असलेल्या भवानी फाटा येथे शासकीय कामासाठी अवैध वाळूचा उपयोग केला जात असल्याच्या तक्रारीची चौकशी करून कारवाई करा व अहवाल सादर करा, असा आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिला आहे. दरम्यान,
नेरीनजीक असलेल्या भवानी फाटा येथे शासकीय कामासाठी अवैध वाळूचा उपयोग केला जात असून यासाठी जवळपास दोन ते तीन हजार ब्रास वाळूसाठा करून ठेवण्यात आल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर या विषयी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सूचना दिल्या होत्या. तसेच या वाळू साठ्याची मोजणी करण्यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी महाजन यांनी सा.बां. विभागाला पत्र देऊन ३ जुलै रोजी या साठ्याची मोजणी करण्यात आली होती. यानंतर या वाळू साठ्यातून निम्मी वाळू रात्रीतून गायब झाल्याचा आरोप तक्रारदाराकडून करण्यात आला होता. यात या ठिकाणी एक हजार पाच ब्रास वाळू असल्याचे पंचनाम्यादरम्यान आढळून आले होते. मात्र या ठिकाणी गुरुवारपर्यंत दोन हजार ब्रासच्यावर वाळू होती, नंतर ती गायब झाल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
या अवैध वाळूसाठ्याप्रकरणी संबंधिताने वाळू कोठून आणली, वाहतुकीच्या पावत्या उपलब्ध आहे का, त्या वैध आहेत का, याबाबत पुराव्यासह चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी व त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी धोडमिसे यांना दिले आहेत.