शिक्षकांना लस द्या
जळगाव : दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. त्याआधी शिक्षकांना कोविड लस देणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर शिक्षकांना लस देण्यात यावी, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी केली आहे. सर्वात जास्त हॉटस्पॉट असलेल्या शहरांमध्ये जळगावचा समावेश आहे. कोरोना प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे प्रशासनाने शिक्षकांना लस द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
मानवसेवा विद्यालयात शहीद दिन साजरा
जळगाव : मानव सेवा विद्यालयात शहीद दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. नंतर इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. शहीद दिनानिमित्त अलका महाजन व सुनील दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. यावेळी प्रतिभा सूर्यवंशी, मुक्ता पाटील आदींची उपस्थिती होती.
पिंप्राळ्यात वीज पुरवठा खंडित
जळगाव : मंगळवारी रात्री जोरदार वारा-वादळासह पावसाने हजेरी लावली. यामुळे पिंप्राळा भागात सलग पाच ते सहा तास वीजपुरवठा खंडित होता. तसेच अनेक भागांमध्ये घरांचे नुकसान झाले तर वृक्ष तुटून पडले. गेल्या काही दिवसापासून वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
सुमित पाटील यांची नियुक्ती
जळगाव : नमो फाउंडेशनच्या सोशल मीडियाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुमित जानकीराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख सुनील पाटील यांनी केली आहे.