विनायक वाडेकरमुक्ताईनगर : गेल्या चार महिन्यात तालुक्यात सर्पदंशाच्या ३८ घटना घडल्या. त्यातील ३६ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाकडे सर्पदंशाच्या पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्याने रुग्णांचे प्राण वाचू शकले आहेत.पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना अधिक घडत असतात. मुक्ताईनगर तालुका हा नैसर्गिक दृष्ट्या वनराई, डोंगरदऱ्यांनी सजला आहे. यामुळे पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनाही अधिक प्रमाणात घडत असतात. दर पावसाळ्यात हे स्वाभाविक असते.भौगोलिक दृष्ट्या तालुक्याची तीन विभागात विभागणी होते. अंतुरली, कुऱ्हा आणि मुक्ताईनगर. यातील मुक्ताईनगर भागात सर्पदंशाच्या घटना घडण्याचे प्रमाण अधिक आहे.तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशाच्या लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. परिणामी सर्पदंशाच्या घटना घडल्यानंतर रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आल्याचा दावा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश पाटील यांनी केला आहे.जून ते आजअखेरपर्यंत सर्पदंशाच्या ३८ घटना घडल्या. त्यात दोघांचे प्राण गेले. मात्र उर्वरित ३६ रुग्ण दगावले.२०१५ पासून तर आजअखेरचा विचार करता सर्पदंशाच्या ४७२ घटना घडल्या. त्यातील ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सर्पदंशावर प्राथमिक उपचार करणारी प्रणाली उपलब्ध असल्याने तुलनेत रुग्ण दगावण्याची शक्यता कमी झाली आहे, असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश पाटील यांना सांगितले.दरम्यान, अति विषारी सर्पदंशानंतर रुग्णाला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवावे लागते. कोथळी येथील एका महिलेला गेल्या महिन्यात सर्पदंशानंतर एक लाख १० हजार बिल भरावे लागले होते. यामुळे तालुक्याच्या ठिकाणी सर्पदंशासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याची गरज आहे.
मुक्ताईनगरात सर्पदंशाच्या लसींमुळे रुग्ण वाचवण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 2:39 PM