फोटो - २६ सीटीआर ३६
सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नेहमीच सकारात्मक विचार, वाचनात सातत्य आणि समाजासाठी काही तरी करण्याची उर्मी या तीन प्रमुख गोष्टींवर भर दिला व त्याच युपीएससी यशाचे माझे गमक आहे, असे स्पष्ट मत युपीएससीत देशातून ४८० रँक प्राप्त केलेले अक्षय प्रमोद साबद्रा यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना व्यक्त केले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने (युपीएससी)घेण्यात आलेल्या ८६० जागांसाठीच्या परीक्षांचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात जळगावातील सीए अक्षय साबद्रा यांनी यश संपादन केले आहे. या पार्श्वभूमीवर 'लोकमत' ने त्यांच्याशी संवाद साधला. दहावीपर्यंतचे शिक्षण सेंट लॉरेन्सस्कूलमध्ये घेतले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सीए व्हायचे ठरविले. त्यादृष्टीने पुढची पाऊलं टाकायला सुरूवात केली. मू.जे.महाविद्यालयात वाणिज्यचे शिक्षण घेतल्यानंतर २१ व्या वर्षी सीए झालो. दरम्यान, समाजासाठी काही तरी करावे हे मनात होते. त्यात युट्यूब व इतर सोशल मीडियावर युपीएससीत यश मिळविलेल्या तरूणांचे व्हीडिओ पहायला लागलो. अन् यातून प्रेरणा मिळाली आणि आपणही युपीएससी देऊन आयएएस व्हायचे ठरविले, असे अक्षय साबद्रा यांनी सांगितले.
अधिक जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला
याआधीही आपण परीक्षा दिली होती. मात्र, अपयशामुळे खचून न जाता अधिक जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. तसेच प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव कायम ठेवला़ त्यानंतर केलेल्या अभ्यासाची वारंवार रिव्हीजन केली. युट्यूबवरील व्हीडिओचाही अभ्यासाचा सोर्स म्हणून उपयोग करीत असताना सेल्फ स्टडीला अधिक महत्व दिले. यासा-याचा परिणाम म्हणून दुस-या प्रयत्नात आपण युपीएससीत यश संपादन केल्याचेही साबद्रा यांनी लोकमत बोलताना सांगितले.
नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर
काही दिवसानंतर नियुक्ती कळणार आहे. मात्र, नियुक्तीनंतर नागरिकांमध्ये राहून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न अधिक राहिल. तसेच निर्णय घेत असताना, त्यामध्ये नागरिकांचा सुध्दा सहभाग असेल, असेही साबद्रा यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या तरूणांनी ही प्रश्नपत्रिका सोडविण्याचा प्रयत्न करत रहावा. जास्तीत जास्त रिव्हिजन करावे व चालू घडामोडीसाठी नियमित वृत्तपत्रांचे विद्यार्थ्यांनी वाचन करावे, अशा टीप्स त्यांनी दिल्या.