लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने आता २८ ते ३० मार्च दरम्यान लॉकडाऊन जाहीर केले होते. या लॉकडाऊनच्या परिस्थितही शहरातील काही महाभाग रस्त्यावर फिरत असतात. अशा महाभागांना पोलिसांचे दंडूकेही वठणीवर आणू शकले नव्हते. मात्र, शहराच्या वाढत जाणाऱ्या तापमानाने विनाकारण शहरात फिरणाºयांना वठणीवर आणले आहे. तापमानाने ४१ अंशाचा पारा गाठल्याने लॉक डाऊन यशस्वी करण्यासाठी वाढते तापमान जिल्हा प्रशासनाला मदतीचे ठरत आहे.
गेल्या आठवडाभरापासून शहरातील तापमानात वेगाने वाढ होत आहे. दोन आठवड्यांपुर्वी ३८ ते ३९ अंश असलेला शहराचा पारा आता ४१ अंशापर्यंत पोहचला आहे. मार्च महिन्यात शहराचे सरासरी तापमान ३८ अंश सेल्सीअस इतके असते. यंदा मात्र सरासरीत एक ते दोन अंशाची वाढ होवून यंदा तापमानाची सरासरी ४० अंश इतकी राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमानासोबतच किमान तापमानातही वाढ झाली असून, मंगळवारी शहराचे किमान तापमान २३ अंश इतके होते. त्यामुळे दिवसासोबतच रात्री देखील नागरिकांना उकाडा जाणवत आहे.
दुपारच्या वेळेस रस्ते पुर्णपणे निर्मनुष्य
शहरात लॉकडाऊनची परिस्थिती असतानाही काही टवाळखोर युवक दुपारच्या वेळेस मोटारसायकलव्दारे शहरात फिरत होते. मात्र,आता तापमानाचा पारा वाढत असल्याने दुपारच्या वेळेस टवाळखोरांची दिसणारी गर्दी दिसत नाही. त्यामुळे वाढत्या तापमानाने खऱ्या अर्थाने प्रशासनाचे काम पुर्ण केले असून, दुपारच्या वेळेस शहरातील रस्ते निर्र्मनुष्य झालेले दिसून येत आहेत. सायंकाळी ७ वाजेपर्यंत उन्हाचे चटके जाणवत असल्याने
कॉलन्यांमध्ये सायंकाळच्या वेळेस होणारी गर्दी देखील कमी झाली आहे.
किरकोळ विक्रेते गायब, मनपा पथकाकडून शहरात पाहणी
शहरात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर चौका-चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून, महापालिकेचे पथक देखील शहरात ठिकठिकाणी फिरत आहेत. लॉकडाउनच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी शहरातील काही भागांमध्ये भाजीपाला विक्रेते व इतर विक्रेत्यांनी दुकाने थाटली याचे चित्र पहावयास मिळाले होते. मात्र मंगळवारी शहरातील किरकोळ विक्रेत्यांनी ही आपला व्यवसाय बंद ठेवला होता. ख्वाॅजामिया चौकात काही प्रमाणात भाजीपाला विक्रेते आढळून आले मात्र दुपारी हे विक्रेते देखील गायब झाल्याचे पहावयास मिळाले. तसेच सर्व व्यापारी संकुलांमध्ये देखील शुकशुकाट पाहायला मिळाला.
तापमानाचा पारा वाढला, लॉकडाऊन आणि विजेचा लंपडाव
एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दुसरीकडे लॉकडाऊन मुळे घराबाहेर न निघण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. अनेक नागरिक लॉकडाऊन गांभिर्याने पाळत आहेत. मात्र, एकीकडे तापमानाचा वाढता कहर आणि दुसरीकडे वीजेचा वारंवार खंडीत होणारा वीज पुुरवठा, यामुळे नागरिकांना घरात थांबणेही कठीण होत आहे. महावितरणच्या भोेंगळ कारभारामुळे ग्र्रामीण भागात दररोज दोन ते तीन तास वीज पुरवठा खंडीत होत आहे.
यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यासह शहरातदेखील दिवसभरात चार ते पाच वेळा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.