लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे म्यूकरमायकोसिसचे निदान झालेल्या महिला रुग्णावर शनिवारी १० जुलै रोजी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. याशिवाय एका तरुणावरही 'बायोप्सी'ची शस्त्रक्रिया करण्यात आली. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जळगाव शहरातील शांतीनिकेतन, अजिंठा चौफुली परिसरातील रहिवासी येथील ३२ वर्षीय महिलेला म्युकरमायकोसिस आजारामुळे त्रास होत होता. जीएमसीत त्या १९ जून रोजी दाखल झाल्या होत्या. म्युकरचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे तपासण्यांमधून समोर आले. महिलेवर उपचारासाठी औषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड, डॉ. आस्था गनेरीवाल, डॉ. अमित भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सी २ कक्षात उपचार करण्यात आले. कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ.अक्षय सरोदे, डॉ.हितेंद्र राऊत यांच्यासह सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.किशोर इंगोले, दंत शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ.इम्रान पठाण, डॉ.श्रृती शंखपाळ, बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ.अनिल पाटील, डॉ.काजल साळुंखे, डॉ. सचिन पाटील, डॉ. स्वप्नील इंकणे, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. उमेश जाधव यांनी महिलेवर शस्त्रक्रिया करण्याकामी परिश्रम घेतले. यासह वॉर्ड इन्चार्ज परिचारिका नीला जोशी, नजमा शेख, जोत्स्ना निंबाळकर, जयश्री बडगुजर, निशा गाढे, ओटी असिस्टंट जितेंद्र साबळे, विजय बागुल, विवेक मराठे, जितेंद्र चांगले आदींनी परिश्रम घेतले.
तरुणावर उपचार
जळगाव शहरातील रथ चौक येथील ३८ वर्षीय तरुणावरदेखील यावेळी 'बायोप्सी' करण्यात आली. हा तरुण ६ जुलै रोजी रुग्णालयात दाखल झाला. त्याला म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे जाणवत होती. तपासणी झाल्यावर त्याला डॉक्टरांनी 'बायोप्सी' करण्यास सुचविले. 'बायोप्सी' म्हणजे रोगनिदान करण्यासाठी शरीरातील उतींना छेद देऊन त्यांची सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने करायची परीक्षापद्धती असते. शनिवारी शस्त्रक्रिया विभागात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.