लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : परप्रांतीय प्रौढाच्या डोळा व मेंदूकडे वाढत जाणाऱ्या बुरशीला शस्त्रक्रिया करून अटकाव घालण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले. या प्रौढाला महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून लाभ मिळण्यास अडचणी येत असल्याने अखेर संबंधित यंत्रणेने प्रयत्न करून पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून या रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया केली.
मध्यप्रदेश येथील बडवाणी जिल्ह्यातील धवळी या गावात राहणाऱ्या ५० वर्षीय रुग्णाला ३० मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना म्युकरमायकोसिसची लागण झाली होती. त्यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेचे नोडल अधिकारी डॉ. अलोक यादव यांनी शर्थीचे प्रयत्न करून त्या रुग्णाला प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समाविष्ट केले. प्रयोगशाळेत मायक्रोस्कोपीद्वारे डॉ. किशोर इंगोले यांनी रोगाचे निदान केले. त्यानंतर संसर्ग अधिक वाढत असल्याने १९ जणांच्या वैद्यकीय पथकाने अखेर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
रुग्णाला मोठा दिलासा
या रुग्णाच्या वरचा दोन्ही बाजूचा जबडा, टाळू आणि वरच्या दातांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. डोळा व मेंदूकडे पसरण्याआधीच ही शस्त्रक्रिया वेळेत झाली. त्यामुळे दोन्ही अवयव वाचले. रुग्णास द्रवपदार्थद्वारे जेवणासाठी पोटाला छिद्र पाडून नळी टाकून व्यवस्था करण्यात आली. शस्त्रक्रियेत कान-नाक-घसा विभागाचे डॉ. अक्षय सरोदे, दंतशल्यचिकित्सा विभागाचे डॉ. इम्रान पठाण, डॉ. श्रुती शंखपाळ, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. उमेश जाधव, डॉ. विपीन खडसे, डॉ. संदीप पटेल, डॉ. स्वाती एम., डॉ. काजल साळुंखे यांच्यासह शस्त्रक्रिया विभागातील नर्सिंग प्रमुख नीलिमा जोशी, नजमा शेख, सहायक जितेंद्र साबळे, जतीन चांगरे, किशोर चांगरे, गणेश डहाके, विवेक मराठे, विजय बागूल, माधुरी इंगळे, लीना चौधरी, कविता राणे आदींनी सहभाग घेतला.