-मुख्य जलवाहिनीवरून पाण्याच्या टाकीत ६ मिनिटात पोहचले पाणी
- १५ लाख लीटरची टाकी भरते केवळ दीड तासात
-केवळ १० टक्के व्हॉल्व्ह उघडल्यावरच भरते टाकी
-पंधरा दिवसात दिले गेले १२०० नळ कनेक्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - रात्री-बेरात्री पाण्यासाठी जागणाऱ्या आणि तब्बल १५ दिवसाआड पाणी पुरवठा होणाऱ्या सुप्रीम कॉलनीवासियांच्या पाण्याचा प्रश्न आता ‘अमृत’ मुळे संपणार आहे. कधीकाळी अर्धा महिना पाण्यासाठी तरसणाऱ्या सुप्रीम कॉलनीवासीयांना आता नियमित पाणी मिळणार आहे. सुप्रीम कॉलनी भागात अमृत योजनेंतर्गत नव्याने पाईपलाईन टाकण्यात आली असून जोडणीसह सर्व काम पूर्ण झाले आहे. सोमवारी गणेश जयंतीच्या शुभमुहूर्ताला महापौर भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत भूमिगत टाकीत पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली असता ती यशस्वी ठरल्याने सुरळीत पाणी पुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २० रोजी या भागातील पाणी योजनेच्या कामाचे उद्घाटन होणार आहे.
सुप्रीम कॉलनीवासीयांना गेल्या १२ वर्षांपासून कधीही नियमित पाणीपुरवठा होत नव्हता, त्यामुळे पावसाळ्यातदेखील या भागातील नागरिकांना पाण्यासाठी रात्री-बेरात्री जागे रहावे लागत होते. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेमुळे सुप्रीम कॉलनीवासीयांना एकप्रकारे नियमित मिळणाऱ्या पाण्याव्दारे अमृतच मिळणार आहे. सोमवारी सुप्रीम कॉलनीत महापौर भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत भूमिगत टाकीत पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, पाणीपुरवठा सभापती अमित काळे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, रियाज बागवान, चंद्रकांत भापसे, मनपा प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, श्यामकांत भांडारकर, मक्तेदार प्रतिनिधी पंकज बऱ्हाटे आदी उपस्थित होते.
एकही कनेक्शन नसलेल्या भागात झाले १२०० कनेक्शन
नियमित पाणी मिळत नसल्याने या भागातील ९० टक्के नागरिकांनी मनपाचे नळ कनेक्शन घेतलेच नव्हते. मात्र, अमृत अंतर्गत या भागात पाईपलाईन टाकली गेल्यानंतर व आता लवकरच पाणी मिळणार असल्याने या भागात आतापर्यंत १२०० नागरिकांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. एका दिवसात १०० ते १५० जणांचे कनेक्शनसाठी अर्ज येत असल्याची माहिती प्रकल्प अभियंता योगेश बोरोले यांनी दिली.
फोर्स प्रचंड कनेक्शन कमी
अमृत योजनेंतर्गत नव्याने पाणीपुरवठा यंत्रणा बसविण्यात आली असून १५ लाख लीटरची भूमिगत पाणी साठवण टाकी तयार करण्यात आली आहे. अमृतची जलवाहिनी वाघूरच्या जलवाहिनीला जोडण्याचे काम संपले असून पंप बसविणे आणि इतर किरकोळ, तांत्रिक कामे देखील पूर्ण झाले आहे. पाण्याचा फोर्स प्रचंड असून, नळ कनेक्शन कमी असल्याने सुरुवातीला कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. आधी या भागात पाण्याचा दाब कमी असल्याने पाणीपुरवठाच होत नव्हता.
दीड तासात १५ लाख लीटरची टाकी भरली
मुख्य जलवाहिनीवरून पाणी सोडल्यानंतर अवघ्या ६ मिनिटात पाणी भूमिगत टाकीत पोहचले. मुख्य जलवाहिनीचा केवळ १० टक्के व्हॉल्व्ह उघडला तरी भूमिगत टाकी भरायला केवळ दीड तास अवधी लागणार आहे. टाकीची पूर्णत: साफसफाई करून दोन दिवसात नागरिकांच्या नळाला पाणी सोडून चाचणी घेतली जाणार आहे.
शनिवारी शुभारंभ
अमृत अंतर्गत सुप्रीम कॉलनीत पहिल्यांदाच पाणीपुरवठा केला जाणार असून, शनिवारी पालकमंत्र्यांचा हस्ते या कामाचे उद्घाटन केले जाणार असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली.
कोट....
सुप्रीम कॉलनीवासीयांची अनेक वर्षांची समस्या आता मार्गी लागणार आहे. रात्री-बेरात्री पाण्यासाठी जागे रहावे लागत होते. विशेष म्हणजे पाण्यासाठी या भागातील महिलांचीच मोठ्या प्रमाणात वणवण होत होती. मात्र, अमृतमुळे सुप्रीम कॉलनीवासीयांची समस्या आता मार्गी लागणार आहे.
-भारती सोनवणे, महापौर