लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत शहरात नव्याने सुरू झालेल्या केंद्रांवर मंगळवारी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. यात मेहरूण येथील मुलतानी दवाखान्यात २०० ची क्षमता असताना एक हजाराचा स्लॉट काढण्यात आल्याने, शिवाय इंटरनेट सेवा बंद पडल्याने प्रचंड हाल झाले. मंडप नाही, बसण्याची व्यवस्था नाही, अशा स्थितीत कोरोनापासून बचाव म्हणून नागरिकांनी चार ते पाच तास उन्हाचे चटकेही सहन केले. यासह चेतनदास मेहता रुग्णालयात गोंधळ उडाला होता. नव्या केंद्राचा पहिला दिवस प्रचंड गोंधळात गेला.
लसीचे डोस प्राप्त झाल्यानंतर शहरात कोरोना लसीकरणासाठी नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या स्वाध्याय भवन व मुलतानी रुग्णालय याठिकाणी केवळ १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण होत आहे. जिल्ह्यात या वयोगटासाठी हे दोनच केंद्र असल्याने दोनशेच्या ऐवजी एका दिवसात प्रत्येक केंद्रावर १ हजार स्लॉट काढण्यात आले होते. हे नियोजन सोमवारी सायंकाळी उशिरा झाल्याने मात्र, प्रशासनाची तारांबळ उडाली होती. तसेच चित्र मुलतानी रुग्णालयात दिसत होते.
स्वाध्याय भवनात सुटसुटीत नियोजन
स्वाध्याय भवन येथे महानगरपालिका व जैन उद्योग समूह यांच्या सहकार्याने १९ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाला मंगळवारपासून सुरुवात झाली. सकाळी नऊपासूनच स्लॉटनुसार या ठिकाणी नियोजन करण्यात आले होते. या ठिकाणी सुटसुटीत नियोजन असून यामुळे गर्दी टाळत लसीकरण केले जात होते. यात पुरुषांसाठी स्वतंत्र दोन कक्ष व महिलांसाठी एक स्वतंत्र कक्ष अशा तीन कक्षांमध्ये लस दिली जात होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, माजी खासगी ईश्वरलाल जैन, जैन इरिगेशन सिस्टीमचे व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन आदी मान्यवरांनी पाहणी केली. दरम्यान, प्रशासनाने नियोजन केल्यास या केंद्रांवर एका दिवसात दोन हजार नागरिकांनाचे लसीकरण आपण करू शकतो, असे अतुल जैन यांनी माध्यमांना सांगितले.
नागरिकांचा संताप
चेतनदास मेहता रुग्णालयात कोव्हॅक्सिनचा डोस असल्याने या ठिकाणी दुसरा डाेस घेणाऱ्या नागरिकांची प्रचंड गर्दी उडाली होती. पहाटे चार वाजेपासून या केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती. या गर्दीतच गोंधळ उडाला होता. लसीचे पुरेसे डोस नसल्याने प्रशासनाचीही तारांबळ उडाली होती. यातच या केंद्रावर दरवाजाही तोडल्याचा प्रकार घडल्याची माहिती आहे.
शाहू महाराज रुग्णालयात गर्दी
महापालिकेच्या शाहू महाराज रुग्णालयात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोविशिल्ड लस उपलब्ध असून नेहमीप्रमाणे या केंद्रांवर गर्दी उसळली होती. दुसरा डोस असणाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य दिले जात आहे. यासह डी.बी. जैन रुग्णालयातही गर्दी उसळली होती. तसेच रोटरी व रेडक्रॉसच्या केंद्रांवर नियमित प्रमाणेच लसीकरण सुरू होते.
लसीकरणाला या, आजार घेऊन जा
लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी बघता, शिवाय उन्हाचा तडाखा बघता लसीकरणाला या आणि आजार घेऊन जा, अशी परिस्थिती केंद्रांवर पाहावयास मिळत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: या केंद्रांवर फज्जा उडत आहे. यातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा अधिक धोका आहे. तासनतास रांगेत उभे राहून लोकांची मानसिकताही खराब होत आहे. मिनिटा मिनिटाला आरडा ओरड या केंद्रांवर होत आहे. मुलतानी दवाखान्यात दुपारी दोन वाजेपर्यंत हे गंभीर चित्र होते.
स्लाॅटनुसारच केंद्रांवर या
१८ ते ४४ वयोगटासाठी केंद्र बुक करताना वेळ निवडायची असते. आपण जी वेळ निवडलेली आहे. त्या वेळेनुसारच केंद्रांवर या, असे आवाहन केंद्रांवर केले जात आहे. ११ ते १ हा वेळ निवडलेले लाभार्थीही सकाळी ६ पासून केंद्रांवर येत असल्याने गर्दी व गोंधळ वाढला आहे. वेळेनुसार आल्यास गर्दीही कमी होईल आणि सुरळीत लसीकरण पार पडेल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
इंटरनेट ठप्प, मोबाइलवर नोंदणी
मेहरूण येथील केंद्रांवर पूर्ण वेढा बसेल अशी गोलाकार भली मोठी रांग होती. मंडप मात्र, एकच असल्याने नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागले. त्यातच या ठिकाणी इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने कर्मचाऱ्यांनी लाभार्थींची मोबाइलवर नोंदणी केली. त्यामुळे वेळ अधिकच गेला. शिवाय गर्दी प्रचंड असल्याने निरीक्षणगृहात पूर्ण अर्धा तासही नागरिक थांबत नव्हते. पाच मिनिटांतच निघून जात होते. अनेकांनी तर लस घेतल्यानंतर पायीच बरेच अंतर कापत घराचा मार्ग धरला होता.