हळहळ : संत मुक्ताबाई राम पालखीचे सेवेकरी जितेंद्र वाळके यांचे निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुखी सदा हरी नाम आणि सतत पांडुरंगाच्या भक्तीची ओढ असलेले निष्ठावंत रामसेवक आणि संत मुक्ताबाई राम पालखीचे सेवेकरी जितेंद्र वाळके यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने ग्रामदैवत श्रीराम मंदिरातील वारकऱ्यांना मोठा धक्का बसला असून, त्यांच्या जाण्याने आम्ही पोरकी झालो असल्याची खंत ग्रामदैवत श्रीराम मंदिराचे गादीपती ह.भ.प मंगेश महाराज जोशी यांच्यासह इतर वारकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
जितेंद्र वाळके यांना नेहमी सर्वजण प्रेमाने जितू काका म्हणून हाक मारीत. ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या परंपरेतील सर्व उत्सवात ते कायम नित्य सेवेत असायचे, त्यात पंढरपूरची वारी, रथोत्सव, श्रीराम नवमी या सर्व उत्सवात अगदी निष्ठेने सेवा करीत.
दरवर्षीची पंढरीची पायी वारी म्हणजे त्यांच्यासाठी आनंदाची पर्वणीच होती. ज्येष्ठ महिना लागला, की वारीची तयारी मोठ्या उत्साहाने करायचे. जळगाव महापालिकेत पाणी पुरवठा विभागात ते नोकरीला होते. पंढरपूरच्या वारी साठी सुट्टी मिळेल की नाही, याची दरवर्षी त्यांना खूप चिंता लागून असायची. मात्र, मंगेश महाराज जितू वाळके यांना चिंता करू नका, श्रीरामचंद्रांच्या व संत मुक्ताईंच्या चरणाशी साकडे घालायचे सांगायचे. पंढरपूरच्या वारीला जाण्याची इच्छा पांडुरंगच पूर्ण करेल, असे सांगून त्यांना नेहमी धीर द्यायचे.
इन्फो :
गेल्या वर्षांची जितू काकांची ठरली शेवटची वारी
कोरोनामुळे गेल्या वर्षी शासनातर्फे पंढरपूरची वारी व यात्रा उत्सव रद्द करण्यात आला होता. फक्त राज्यभरातील प्रमुख पालखीना पाच वारकऱ्यांच्या उपस्थित पंढरपूरला येण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मंगेश महाराज यांना विणेकरी, पखवाजी, चोपदार, पालखीवाले व ते स्वतः मिळून पाच जण होत असल्याने, जितेंद्र वाळके यांना पंढरपूरला कसे घेऊन जायचे असा प्रश्न पडला होता. मात्र, यावेळी ठरलेल्या पाच जणांपैकी दोन जणांनी अचानक वारीला येण्याचे टाळल्यानंतर, या मध्ये जितू काकांचा नंबर लागला. मंगेश महाराजांनी जेव्हा जितू काकांना पंढरपूरला वारीला येण्याचा निरोप दिला, तेव्हा जितू काकांना गगनात मावेनासा आनंद झाला होता. त्यानंतर ते मोठ्या आनंदाने पंढरपूरच्या वारीला गेले आणि ती त्यांची शेवटची वारी ठरली.
इन्फो :
अन् वारकरी मंडळी झाली ''पोरकी''
उत्साह, पांडुरंगाची ओढ, भक्तिभाव आणि इतरांना प्रति स्नेह व प्रेमा मुळे जितू काकांनी सर्वांच्या मनात घर केले होते. वारीमध्ये सर्व प्रकारची सेवा ते करायचे, इतरांची काळजी घ्यायचे, त्यांच्या शिवाय पंढरपूरची वारी म्हणजे शक्यच होत नसे. त्यांच्या शिवाय आमची यंदाची पंढरपूरची वारी कशी साजरी होणार, अशी खंत या वारकरी मंडळीतून व्यक्त करण्यात येत आहे.